पुण्यातील रस्ते तुंबलेलेच; अन् पदपथांवरही ‘ठेचा’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 01:03 PM2019-08-23T13:03:44+5:302019-08-23T13:08:48+5:30

पदपथांना अतिक्रमणांचे ग्रहण तर सदैव लागलेलेच असते. आजकाल पदपथ दुचाकी पार्किंगचे हक्काचे ठिकाण बनत चालले आहे.

Road foothpaths are not safe for peoples in pune | पुण्यातील रस्ते तुंबलेलेच; अन् पदपथांवरही ‘ठेचा’

पुण्यातील रस्ते तुंबलेलेच; अन् पदपथांवरही ‘ठेचा’

googlenewsNext
ठळक मुद्देपादचाऱ्यांची दैैना : पुण्यात चालणे झाले मुश्कील; धन्यवाद (!) पुणे महापालिका

पुणे : पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने दि. २३ ऑगस्ट २०१६ रोजी एकमताने शहरासाठी ‘पादचारी धोरण’ मंजूर केले. पादचारी धोरण असणारे पुणे हे देशातील पहिले शहर आहे. शहरातील रस्त्यांवर चालण्यासाठी पदपथ, रस्ते ओलांडण्यासाठी पादचारी सिग्नल व इतर सोयीसुविधा उभारणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे व पादचाऱ्यांना सहज, सुरक्षितपणे चालता येईल अशी सुयोग्य व्यवस्था निर्माण करणे हा पादचारी धोरणाचा उद्देश आहे; मात्र मागील तीन वर्षात काही मोजके रस्ते वगळता इतर भागातील परिस्थतीत काही फरक पडल्याचे दिसत नाही. 
पादचारी धोरणाच्या बरोबरीने शहरातील रस्त्यांच्या रचनेबाबत मार्गदर्शक तत्त्वेदेखील तयार करण्यात आली आहेत. यात पादचारी सुविधा कशा असाव्यात, याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. तीन वर्षांच्या काळात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत जंगलीमहाराज रस्त्यासह अन्य रस्त्यांवर चांगले प्रशस्त पदपथ बांधण्यात आले, ही गोष्ट निश्चितच  स्वागतार्ह आहे. आज पुण्यात सुमारे १४०० किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यातील सुमारे दहा टक्के रस्त्यांवरच दोन्ही बाजूला ३० टक्के रस्त्यांवर केवळ एकाच बाजूला पदपथ आहेत. उर्वरित ६० टक्के रस्त्यांवर पदपथच नाहीत. बहुतेक ठिकाणची पदपथांची स्थिती व्यवस्थित नाही. पदपथांना अतिक्रमणांचे ग्रहण तर सदैव लागलेलेच असते. यात विक्रेते तर आहेतच; परंतु प्रशासनाची अतिक्रमणे देखील फार मोठ्या प्रमाणावर आहेत. ही अतिक्रमणे पादचाऱ्यांचा मार्ग रोखतात; तसेच विविध प्रकारच्या अनेक अडथळ्यांचा सामना पादचाऱ्यांना करावा लागतो. 
आजकाल पदपथ दुचाकी पार्किंगचे हक्काचे ठिकाण बनत चालले आहे. मोटार गाड्या व टेम्पो देखील पदपथावर बिनदिक्कतपणे उभे केले जातात. वाहतूककोंडीच्या रस्त्यांवर तर दुचाकी पदपथांवर बेधडकपणे चालविल्या जातात. रस्त्याचे काम सुरू असल्यास परिस्थिती आणखीच बिकट होते. सर्व प्रकारचे सामान, राडारोडा, ठेकेदाराचे कार्यालय, कामगारांच्या झोपड्या, सर्वकाही पदपथांवर असते; पण पादचाऱ्यांना दुसरा सुयोग्य मार्ग उपलब्ध करून दिला जात नाही. सध्याचे मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी असेच विदारक चित्र दिसते. 
......
पथारीवाल्यांचे अतिक्रमण
पृष्ठभाग समपातळीत नसणे
रुंदी कमी-जास्त होणे
उघडलेले ब्लॉक, फरशा
वर आलेली गटारांची झाकणे
विविध कामांसाठी खोदलेले खड्डे
आकस्मिक चढ-उतार
महावितरणेच फीडर पिलर बॉक्स
वीज, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे खांब
जाहिरातीचे फलक
बसथांब्यांचे शेड
पालिकेचे नागरी सुविधा केंद्र, आरोग्यकोठी
सार्वजनिक स्वच्छतागृह
बीएसएनएलचे बॉक्स
चुकीच्या पद्धतीने लावलेली झाडे, त्यांच्या फांद्या
.....
उत्तम पादचारी धोरण बिनकामाचे : पादचारी अपघातांमध्ये अनेकांचे मृत्यू 
‘स्मार्ट सिटी’ बनण्याची आस असलेल्या पुणे शहरात एक उत्तम पादचारी धोरण असतानाही पादचारी सुविधांची स्थिती अशी दयनीय असावी, हे अतिशय दुर्दैवी आहे. आज रस्त्यावरून चालणे व रस्ता ओलांडणे अतिशय अवघड व धोकादायक झाले आहे. मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. दर वर्षी पादचारी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडत आहेत. असे असतानाही प्रशासनाचे लक्ष मात्र वाहनांच्या वाहतुकीवरच केंद्रित आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी आपली मानसिकता बदलून पादचारी धोरण गांभीर्याने घ्यावे व त्यात समाविष्ट बाबी त्वरित अमलात आणाव्यात. पादचाºयांना कायम अत्युच्च प्राधान्य दिले जाणे, हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे व काळाजी गरज आहे. - प्रशांत इनामदार, निमंत्रक, पादचारी प्रथम
..........
रस्त्यांवर पादचारी असुरक्षित
अयोग्य झेब्राक्रॉसिंग
वाहनांचा वाढलेला वेग
पदपथ व रस्त्यांमधील अशास्त्रीय अंतर
पादचारी सिग्नल नसणे
झेब्राकॉसिंगजवळ उभे राहण्यासाठी जागा नसणे
पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे
दिव्यांग पादचाºयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष
....
पादचारी धोरणात काय ?
सर्व रस्त्यांवर सुरक्षितपणे चालता येईल अशी व्यवस्था हवी
उड्डाणपूल व सब-वे मध्येही पदपथ असावेत
पदपथांची उंची-रुंदी निकषानुसार हवी
रस्त्यांचे सुशोभीकरण करताना चालण्याची जागा कमी करू नये
पदपथालगतची पार्किंग सलग नको
....
सिग्नल यंत्रणेत पादचाऱ्यांसाठी सिग्नल हवेत
पदपथ कोणत्याही अडथळ्यांशिवाय असावेत
पदपथांचे ऑडिट व्हावे
पदपथांची देखभाल, नवीन पदपथ, सुविधांसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद हवी
......

Web Title: Road foothpaths are not safe for peoples in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.