सर्दी फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्यांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:33 AM2020-09-20T10:33:07+5:302020-09-20T10:35:01+5:30

महापालिकेने सर्दी, फ्ल्यूसदृश्य लक्षणे तसेच दमा व सारी या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे.

Regional medical officers should be informed of flu-like symptoms | सर्दी फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्यांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी

सर्दी फ्ल्यूसदृश्य लक्षणे असलेल्यांची माहिती क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी

Next
ठळक मुद्देमहापालिकेचे खाजगी क्लिनिक/ डिस्पेन्सरीला आदेश         

पुणे : कोरोनाची सौम्य लक्षणे असतानाच, संबंधितांना वेळीच उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करणे़ या उद्देशाने महापालिकेने आता शहरातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी येथे सर्दी, फ्ल्यूसदृश्य लक्षणे तसेच दमा व सारी या आजारावर उपचार घेण्यासाठी दाखल होणाऱ्या रूग्णांची माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. याकरिता शहरातील सुमारे साडेतीन हजार खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी यांना सदर माहिती देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. 
        महापालिकेच्या आरोग्य विभा गाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ़मनिषा नाईक यांनी याबाबत माहिती दिली. शहरातील खाजगी क्लिनिकमध्ये दररोज शेकडो नागरिक सर्दी, खोकला, ताप आल्यास तपासणीसाठी जातात व औषधे घेतात. पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व रूग्णांची माहिती महापालिकेने मागविण्याचे ठरविले असून, याबाबतचे आदेश शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी काढण्यात आले आहेत. यापुढे सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरीमध्ये कोरोनासदृश्य वरील लक्षणे असलेल्या रूग्णांची माहिती संबंधित आस्थापना अथवा डॉक्टरांना ठेवावी लागणार आहे. तसेच ती दैंनदिन स्वरूपात संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ईमेलव्दारे कळवावी लागणार आहे. यात रूग्णाचे नाव, वय, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक, आजाराचा प्रकार, ऑक्सिजनची पातळी व अन्य आजार ही माहिती नमूद करणे जरूरी आहे.
         दरम्यान, कोरोनासदृश्य आजार असलेल्या रूग्णांची माहिती संकलित करण्यासाठी, सर्व क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक तसेच सर्वेक्षणातील कर्मचारी यांनाही याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी आपल्या नियंत्रणाखालील कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी दवाखाने, क्लिनिक व डिस्पेन्सरी येथे वैयक्तिकरित्या जाऊन, सदर माहिती संकलित करण्याबाबत सूचित करावे. तसेच दैनंदिन स्वरूपात संकलित झालेल्या माहितीच्या आधारे संशयित रूग्णांच्याबाबतीत योग्य ती कार्यवाही करावी असेही सांगण्यात आले आहे.

Web Title: Regional medical officers should be informed of flu-like symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.