पुणे शहरातील ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये दुर्मीळ वृक्ष, वेलींचा ‘चांदवा’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 07:26 PM2020-07-03T19:26:33+5:302020-07-03T19:28:05+5:30

'एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन' मध्ये २५० च्या वर वृक्षांच्या प्रजातींचा सांभाळ येथील ३७ एकरांतील जागेत कित्येक वर्षांपासून होत आहे

Rare tree in ‘Empress’, vine ‘canopy’ | पुणे शहरातील ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये दुर्मीळ वृक्ष, वेलींचा ‘चांदवा’

पुणे शहरातील ‘एम्प्रेस गार्डन’मध्ये दुर्मीळ वृक्ष, वेलींचा ‘चांदवा’

googlenewsNext
ठळक मुद्देगार्डनमध्ये दोनशेहून अधिक वृक्ष : विविध पक्ष्यांचा बनले आहे अधिवास

पुणे : शहरातील अतिशय जुने आणि वृक्षवेलींनी बहरलेले एम्प्रेस गार्डन हे खरंतर 'ग्रीन हेरिटेज' घोषित करायला हवे, अशी अपेक्षा वनस्पती अभ्यासकांची आहे. कारण या ठिकाणी अनेक दुर्मीळ वृक्ष-वेलींच्या प्रजाती आहेत. दोनशेहून अधिक वृक्ष थाटात बहरत आहेत. दुर्मीळ आणि जुन्या वृक्षांचे हे जणू वनच बनले आहे.
 एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन जैवविविधतेचे महत्त्वाचे ठिकाण आहे.  या विषयी वनस्पती शास्त्र अभ्यासक डॉ. श्रीनाथ कवडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले,एम्प्रेस गार्डन आणि वन खात्याच्या संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेले 'ब्लू मॉर्मन' सारखे फुलपाखरू, मोराच्या १०-१२ जोड्या तसेच 'राखाडी धनेश', 'पॅरॅकेट्स', 'बुलबुल', 'स्वर्गीय नर्तक' किंवा 'पॅराडाईज फ्लायक्याचर', 'सनबर्ड', 'फॅनटेल', 'किंग फिशर', ' ग्रीन बी इटर', 'टेलर बर्ड', 'म्यागपाय रॉबिन', 'ड्रोनगो', 'घुबड', 'घार', इ. पक्षी सापडतात. आग्या मोहोळच्या माश्या, सातेरी व स्टिंग लेस बी, इ. मधमाशांच्या  नोंदी इथे आहेत. सरडा, पाली, धामण, नाग, वीरूळा, घोणस, गवत्या सारखे सरपटणारे प्राणीही आढळून येतात.


गार्डनमध्ये २५० च्या वर वृक्षांच्या प्रजातींचा सांभाळ येथील ३७ एकरांतील जागेत कित्येक वर्षांपासून होत आहे. पुण्यातील 'वृक्षांचे वन' अथवा 'आबोर्रेटम' म्हणता येईल, असे बरेच मोठे वृक्ष इथे आहेत. त्यात पार्किंगमधील दक्षिणी मोह, वाडग्याचे झाड, गोरख चिंच, बाभूळ कुळातील 'दीवी दीवी' हे वृक्ष आपले वेगळेपण टिकवून आहेत. दक्षिणी मोहाचे भले मोठे झाड ८० - ९० फुट वाढलेले असून फेब्रुवारी- मार्च मध्ये यावर बरीच वटवाघळं आपली भूक भागवत असतात. बासमती तांदळासारखा वास असणाºया फुलाच्या पाकळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. ऑफिस च्या जवळच सर्वांत जुने व प्रचंड मोठे असे वडाचे झाड बहुदा अडीचशे-तीनशे वर्षांचे असावे.  फुलांचा वास घोडयाच्या लिदी सारखा असतो तर बियांचा उपयोग आदिवासी लोक पौष्टिक खाद्य म्हणून करतात.
गार्डन च्या मध्य भागी पिवळ्या खोडाचा 'किन्हई', 'पांढरा शिरीष'  किंवा 'अल्बिझिया' चा प्रचंड मोठा वृक्ष बहुदा याच गार्डन मध्ये इतका मोठा असावा. ४० फुटांनंतर तो विस्तारलेला असून गार्डन मधील पॅराकेट्स, राखाडी धनेश सारख्या महत्वाच्या पक्ष्यांचा महत्वाचा अधिवास म्हणून काम करीत आहे. गार्डन मध्ये जंगलाचा फील देणारे 'स्टर्कुलिया आलाटा', 'महोगनी', 'सीता अशोक', 'माधवी लता', 'किन्हई', इ चा समावेश करता येईल.
एम्प्रेस गार्डनसाठी सुरेश पिंगळे, सुमनताई किर्लोस्कर आदी पदाधिकारी चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने ही हिरवाई अजूनही टिकून आहे.
 ===========

महाकाय वेलींच्या अनेक प्रजाती
गार्डनमध्ये महत्वपूर्ण महाकाय वेलींच्या ४ - ५ प्रजाती सापडतात. त्यात 'कांचन वेल' किंवा 'बाहुनीया वाहली' हा चिंच कुळातील महाकाय वेल पुणे परिसरात याच गार्डनमध्ये आढळतो. साधारणत: ३० मी लांबी पर्यंत वाढणाºया या वेलाने आपला पसारा त्याही पेक्षा अधिक वाढविलेला असून ८-१० वृक्षांवर आपले अधिराज्य अविरत गाजवित आहे, अशी माहिती डॉ. श्रीनाथ कवडे यांनी दिली.

दोनशे वर्षांची महाकाय वेल
'पिळुकी' किंवा 'कोम्बरेटम' हा महाकाय वेल आपल्याला एखादया जंगलाची आठवण करून देतो. तसेच सीता अशोकाच्या झाडांवर वाढलेली 'डेरीस स्कॅनन्डेन्स' ही लक्षवेधक महाकाय वेल 'करंज वेल', 'गरुड वेल' अशा मराठी नावाने तर 'ज्वेल वाईन' या इंग्रजी नावाने ओळखली जाते. २०० वर्षांपेक्षा जास्त वय असलेली ही वेल खोडाजवळ दहा-बारा फुटांपर्यंत दोर खंडाच्या गाठीसारखी वाढलेली असून अशी ही भारतातील एकमेव महाकाय वेल असावी. 
 

Web Title: Rare tree in ‘Empress’, vine ‘canopy’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.