‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:37 PM2020-06-29T17:37:28+5:302020-06-29T17:38:35+5:30

सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत या योजना राबविल्यानंतर खासगी मिळकतधारकांना करात सवलत; मात्र सरकारी पातळीवर या योजनांकडे दुर्लक्ष

Rainwater harvesting will save 5 crore liters of water in Pune | ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ केल्यास पुण्यात ५ कोटी लिटर पाण्याचा संचय

googlenewsNext
ठळक मुद्देखासगी तीन हजार इमारतींवर योजना; शासकीय इमारतींवर होईना अंमलबजावणी 

श्रीकिशन काळे 

पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर त्याचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सरकारकडून २००२ मध्येच सर्व शासकीय इमारतींवर ‘शिवकालीन साठवण योजना’ (रेन वॉटर हार्वेस्टिंग) बंधनकारक केली आहे. परंतु, त्याची अजून तरी पूर्णपणे अंमलबजावणी केली नाही. शहरातील पालिकेच्या  सुमारे १ हजार इमारतींपैकी फक्त शंभर इमारतींवरच ही योजना राबविली आहे. तसेच खासगी २९४५ इमारतींवर ही योजना राबविली असून, इतरही योजना राबवून करात सवलत प्राप्त केली आहे. पुणेकरांनी ही योजना शंभर टक्के राबविली तर तब्बल ५ कोटी लिटर पाणी भुगर्भात साठविले जाऊ शकते. 
सोलर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत या योजना राबविल्यानंतर खासगी मिळकतधारकांना करात सवलत मिळते. सरकार पातळीवर या योजनांकडे दुर्लक्ष होते. सुमारे १४ हजार नोंदणीकृत सोसायट्या आहेत. त्यातील सुमारे ३ हजार जणांनी योजना राबविली. शहरात सुमारे पालिकेच्या १ हजार मिळकती आहेत. त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे, अशी माहिती  रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ कर्नल (निवृत्त) सुरेश दळवी यांनी दिली. दळवी म्हणाले,‘‘ शहरात सर्वत्र ही योजना राबविल्यास सुमारे ५ कोटी लिटर पाणी भुगर्भात जाईल. महापालिकेतर्फे प्रतिसाद आहे. पण जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेकडून काहीच काम झाले नाही. पालिकेतर्फे नव्या इमारती होताना त्याला ही योजना बंधनकारक केली.’’ 
खासगी इमारतींमध्ये राबविल्यास त्यांना महापालिकेतर्फे मिळकतकरात सवलत देण्यात येते. या सवलतींचा २०१९ मध्ये ८६ हजार ८३६ मिळकतधारकांनी लाभ घेतला, तर २०२० पर्यंत सुमारे १ लाख १ हजार २२ मिळकतधारकांनी फायदा घेतला. यातून २०१९ मध्ये ४ कोटी ९३ लाख रूपयांची सवलत पालिकेतर्फे सोसायट्यांना दिली असून, २०२० मध्ये ६ कोटी २४ लाख ९६ हजार १४१ रूपयांची सवलत दिली, अशी माहिती महापालिकेचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी दिली. 
====================
भूपृष्ठावरील पाण्यावर हक्क सांगता येतो, परंतु, भुजलातील पाण्यावर अजून तरी हक्क सांगता येत नाही. त्यामुळे जलपुनर्भरण केल्यावर ते पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी घेता येऊ शकते. जलसंधारणाच्या विविध उपाय योजनांतर्गत भूजलाचे पुनर्भरण केले जाते. ते पाणी पावसापासून मिळते. प्रत्येकाने आपल्या घरावर अशी सोय केल्यास जलपुनर्भरण उत्तम होईल. 
- कर्नल (निवृत्त) सुरेश दळवी, रेन वॉटर हार्वेस्टिंग तज्ज्ञ 
 

Web Title: Rainwater harvesting will save 5 crore liters of water in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.