बारामतीत लॉकडाऊनमध्ये पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:09 PM2020-04-11T20:09:05+5:302020-04-11T20:15:23+5:30

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर बारामतीत घडली घटना

Put a vehicle on police body in lockdown period at baramati | बारामतीत लॉकडाऊनमध्ये पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न

बारामतीत लॉकडाऊनमध्ये पोलिसाच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देमला सोडा अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी करेन , अशी पोलिसांनाच धमकीसरकारी कामकाजात अडथळा, कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे कायद्यानुसार गुन्हा दाखल

बारामती: लॉकडाऊन च्या काळात बाहेर का फिरतो अशी विचारणा करणाऱ्या एकाने थेट पोलिसांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोरच हा प्रकार घडला. शुक्रवारी (दि 10) ही घटना घडली असून  लाला आत्माराम पाथरकर (रा. आमराई, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी वैभव साळवे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़
 शहरातील भिगवण चौक येथे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह साळवे, पोलिस शिपाई कोठे, शासकीय वाहनाचे चालक गावडे, इंगोले हे येथील भिगवण चौकात सेवेवर होते. अत्यावश्यक सेवेतील लोकांना तपासत त्यांना सोडण्यात येत होते. यावेळी पाथरकर हा त्याच्या स्कुटी वरून (क्र -एमएच-४२, एके-३१०९) त्या ठिकाणी आला. यावेळी पोलिसांनी त्याला लॉकडाऊनच्या काळात बाहेर कशाला फिरता अशी विचारणा केली.त्यावर पाथरकर याने त्याची बहीण आजारी असल्याचे पोलिसांना सांगितले.याचवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी  शिरगावकर हे त्याला विचारणा करीत होते . चौकशी सुरू असताना पाथरकर गाडी चालू करू लागला. त्यामुळे पोलीस कर्म चारी साळवे यांनी त्याची गाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, पाथरकर याने   थेट अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. साहेब मी आत्महत्या करेन असे म्हणत इमारतीच्या खांबाला त्याने धडका घेत स्वत: जखमा करून घेतल्या. मला सोडा अन्यथा तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी करेन , अशी धमकी त्याने पोलिसांनाच दिली.
शिवाय एकमेकांना चिकटल्याने कोरोना व्हायरस होतो ना , असे म्हणत त्याने पोलिस कर्मचाऱ्यांना अंगाला अंग घासत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालणे यासह आपत्ती व्यवस्थापन कायदा,  कोविड १९ च्या कायद्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Put a vehicle on police body in lockdown period at baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.