कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 20:47 IST2025-12-02T20:45:50+5:302025-12-02T20:47:24+5:30
अटक वॉरंट बजावण्याचा आदेश देण्यासंबंधी प्रकाश आंबेडकर यांचा आयोगाकडे विनंती अर्ज

कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर
पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगलीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी दोन नोटीस बजावूनही ठाकरे यांनी ते सादर केले नाही. त्यामुळे आयोगाने ठाकरे यांना जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली. तरीही उद्धव ठाकरे अथवा त्यांच्यातर्फे कुणीही प्रतिनिधी मंगळवारी ( दि. २) आयोगासमोर हजर झालेले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्यासाठी आदेश द्यावा असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक- अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे केला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याकडील २४ जानेवारी २०२० रोजीचे शरद पवार यांनी दिलेले पत्र व संबंधित कागदपत्रे दाखल करणे संदर्भात निर्देश दिले होते. परंतु दुर्देवाने ठाकरे यांनी आयोगाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले.
त्यांनतर मागील तारखेला आयोगाने ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंटबजावणीचा हुकूम का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तरीही ठाकरे किंवा कोणीही प्रतिनिधी आयोगापुढे हजर झाला नसल्याने उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट बजावण्यासाठी आदेश देण्यासंबंधी प्रकाश आंबेडकर यांनी विनंती अर्ज आयोगाला केला आहे.