पावसाची उघडीप, नीरा परिसरात थंडीचा कडाका वाढला; रब्बी पेरणीसाठी लगबग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 18:35 IST2025-11-12T18:34:42+5:302025-11-12T18:35:24+5:30
नीरा परिसरात यावर्षी तब्बल आठ महिन्यांपासून पावसाने तळ ठोकला होता. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन दिवसातही पाऊस बरसला.

पावसाची उघडीप, नीरा परिसरात थंडीचा कडाका वाढला; रब्बी पेरणीसाठी लगबग सुरू
नीरा : समाधानकारक पाऊस व दोन दिवसांपासून पडलेली थंडी यामुळे शेतकरी गहू, हरबरा पेरणीच्या तयारी करत आहे. नीरा शहरातील शेती निविष्ठांच्या दुकानांत १२ ते १५ प्रकारचे गव्हाचे बियाणे उपलब्ध असून शेतकरी या बियाण्याची खरेदी विचारपूर्वक करत आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे आता शेतजमीनीत वापसा आला असून, रब्बीतील पेरणी पुर्व मशागती व पेरणीची लगबग सुरु झाली आहे.
नीरा परिसरात यावर्षी तब्बल आठ महिन्यांपासून पावसाने तळ ठोकला होता. ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन दिवसातही पाऊस बरसला. आता गेली आठवडाभरापासून विश्रांती घेतली आहे. तर गेली दोन-तीन दिवसांपासून थंडीही चांगल्या प्रमाणावर पडत आहे. याचा फायदा शेतकरी घेत आहेत. गहू पेरतानाच त्याला पोषक अन्नद्रव्य मिळावे यासाठी खतांची मात्रा ही पेरणी करताना दिली जात आहे. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायिकांची दुकानांमध्ये शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी ‘गोल्डन पिरियड’ म्हणून या काळात पेरणी पुर्व मशागत, पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्याची व पेरणीसाठी लागणारे मजूर तसे साधनांचा जुळवाजुळव सुरू आहे.
यावर्षी खरिपात व आता रब्बी हंगामात ही शेतीला पोषक वातावरण असल्याने, शेतकरी मोठ्या लगभगिनी गव्हाची पेरणी करत आहेत. पेरणीसाठी बैल जोडी नसली तरी, छोटा ट्रॅक्टर द्वारे ह्या पेरणीची धांदल सध्या प्रत्येक शेत शिवारात दिसून येत आहे. या ट्रॅक्टर पेरणीसाठी ही ट्रॅक्टर चालकांची मोठी मागणी वाढली आहे.
शेती कामासाठी बैलांची संख्या कमी असल्याने शेतकरी युवकांकडून छोट्या ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केलेली आहे. गाव खेड्यातील वाड्या वस्त्यांवर आता छोटे ट्रॅक्टर दिसू लागले आहेत. या ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत व पेरणी केली जाते. यासाठी लागणारी अवजारे ही या युवकांनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे या ट्रॅक्टरच्या चालकांकडून आता मशागती व पेरणीची कामे कमी वेळेत केली जात आहेत. छोट्या ट्रॅक्टरचे चालक यासाठी सकाळपासूनच वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेळापत्रक देऊनच पेरणी उरकत आहेत. सलग १२ ते १६ तास हे ट्रॅक्टर चालक शेतीची मशागत व त्यानंतर पेरणी करत आहेत. त्यामुळे त्यांचे सध्या सुगीचे दिवस असून, या कष्टाचे चीज पीक आल्यावरच त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते.
यंदा चांगल्या पावसामुळे भुजल पातळी वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या शेत पिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे खरिपामध्ये बाजरी व इतर पिकांची चांगली पेरणी व मुबलक असे पीक हातात आल्यानंतर आता रब्बीतील गहू, हरबरा , मका पेरणी सुरू आहे. गव्हाचे विविध प्रकारचे वाण मोठ्या प्रमाणावर यावर्षी बाजारात आहेत. शेतकरी स्वतःला खाण्यासाठी वेगळ्या बियण्याची निवड करतात तर विक्रीसाठी ज्या वाणाचा जास्त उतार आहे ते गव्हाचे पीक बियाणे पेरणी करत आहेत.
"शेती निविष्ठांची दुकाने शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पुरविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गव्हाणी तब्बल १५ प्रकारची बियाणे नीरा बाजारपेठेत दाखल झाली आहेत. त्यामध्ये ग्रीन गोल्ड २३, श्रीराम सुपर ३०३, अनुकूल केदार, अजित, ओम दिव्या शक्ती, गोल्ड अन्नपूर्णा या प्रमुख बियाण्याची मागणी अधिकची आहे. पेरणी करतानाच लागणाऱ्या खतांचा ही मुबलक साठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः सुफलाम १५-१५-१५ आदी खते तसे विविध औषधे यांची उपलब्ध आहेत."