कर्मयोगी सहकारी साखर कारखाना देणार तीन हजार ३५९ रुपये दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:29 IST2025-12-09T17:28:44+5:302025-12-09T17:29:30+5:30
यातील पहिला हप्ता तीन हजार २०० रुपयांचा असणार आहे. उर्वरित १५० रुपयांची रक्कम दिवाळीला शेतकऱ्यांना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कर्मयोगी सहकारी साखर कारखाना देणार तीन हजार ३५९ रुपये दर
इंदापूर : शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन तीन हजार ३५९ रुपयेप्रमाणे ऊसदर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. यातील पहिला हप्ता तीन हजार २०० रुपयांचा असणार आहे. उर्वरित १५० रुपयांची रक्कम दिवाळीला शेतकऱ्यांना दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले की, कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांच्या सहयोगातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम यशस्वीपणे केले जात आहे. कारखाना उत्कृष्टपणे चालू आहे. आजअखेर कारखान्याचे एक लाख ६५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ऊस उत्पादकांनी सर्व ऊस हा कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
गेल्या आठ-दहा वर्षांपासून कर्मयोगी सहकारी कारखाना आर्थिक अडचणीला सामोरे जात होता. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन येणाऱ्या आर्थिक अडचणीवर मात करून प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी व्हावा, असे प्रयत्न त्या काळापासून सुरू होते. सहयोगाच्या भूमिकेमुळे त्याला यश मिळू लागले आहे. हे चित्र कायम राहील, असा विश्वास हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.