पुणे महापालिकेचा कारभार ‘दादां’च्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 11:00 PM2019-12-03T23:00:00+5:302019-12-03T23:00:02+5:30

खासदार गिरीश बापटांचा गट उपेक्षित

Pune Municipal Corporation power in Chandrakant Patil hand | पुणे महापालिकेचा कारभार ‘दादां’च्या हाती

पुणे महापालिकेचा कारभार ‘दादां’च्या हाती

googlenewsNext
ठळक मुद्देसभागृह नेते - स्थायी अध्यक्षांची निवड भाजपाच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ९९

पुणे : महापालिकेतील खांदेपालट होत असतानाचा दुसऱ्या बाजूला शहरातील भाजपाची आणि महापालिकेतील राजकारणाची सूत्रं ‘कोथरुड’च्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या आहेत. महापौरपद कोथरुड मतदार संघाकडे गेल्यानंतर सभागृह नेतेपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद कसबा मतदार संघाकडे देण्यात आलेले असले तरी ही पदे देताना ती बापट गटाकडे जाणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात आली. या दोन्ही पदांच्या नेमणुकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचेच वर्चस्व पुन्हा दिसून असून पालिकेचा कारभार आता ‘दादां’च्या हाती आला आहे. 
पालिकेमध्ये भाजपाची एकहाती सत्ता आहे.

भाजपाच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ९९ आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आठही मतदार संघांमध्ये भाजपाचे आमदार निवडून आले होते. त्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलत गेली. भाजपामध्ये २०१७ सालच्या महापालिका निवडणुकांच्या काळात मोठया प्रमाणावर ‘इनकमिंग’ही झाले. यामध्ये खासदार संजय काकडे अधिक सक्रिय दिसून आले. बाहेरुन आलेल्यांपैकी बहुतांश उमेदवार निवडूनही आले. पालिकेत सत्ता आल्यानंतर आपसूकच काकडे आणि बापट असे दोन गट भाजपामध्ये उघडपणे दिसत होते. यामध्ये २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत भर पडली. 
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आल्यानंतर पाटील शहरात सक्रिय झाले. तत्पुर्वी गिरीश बापट यांना लोकसभा निवडणुकीत विजयी करुन दिल्लीला पाठविण्यात आले. हा एकप्रकारे त्यांची शहर संघटनेवरील पकड कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, पालिकेतील अनेक नगरसेवकांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे राबता वाढविला. विधानसभेसाठी कोथरुडमधून नगरसेवक मुरलीधर मोहोळ, कसबा मतदार संघामधून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने इच्छूक होते. टिळक यांना उमेदवारी मिळून त्या विजयीही झाल्या. परंतू, या तिघांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांची अनुक्रमे महापौर, सभागृह नेता आणि स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 
पाटील यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाºया मोहोळ यांची महापौरपदी वर्णी लागल्यावर पक्षाकडून सभागृह नेते आणि स्थायी अध्यक्ष, पीएमपीएमएल संचालक बदलाच्या हालचाली सुरु झाल्या. या पदांसाठी बापट आणि काकडे गट आग्रही होते. बापट गटाचे समजले जाणारे नगरसेवक महेश लडकत यांचे नाव लावून धरण्यात आले होते. यासोबतच घाटे हे सुद्धा सभागृह नेते पदासाठी आग्रही होते. कसबा मतदार संघातीलच दुसरे नगरसेवक हेमंत रासने यांनीही स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ताकद लावायला सुरुवात केली होती. 
पालिकेमध्ये एकाच मतदार संघाला दोन महत्वाची पदे कशी द्यायची अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे अन्य मतदार संघांमधील नगरसेवकांना संधी मिळेल अशी आशा होती. परंतू, भाजपाच्या १४-१५ ज्येष्ठ नगरसेवकांना विविध प्रकारची पदे देण्यात आलेली होती. त्यामुळे पदे देताना या गोष्टीचाही विचार सुरु होता. दरम्यान, घाटे की लडकत अशी स्थिती असतानाच घाटे यांचे नाव सभागृह नेतेपदाकरिता घोषित करण्यात आले. स्थायीच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे रासने यांची निवड झाली. ही दोन्ही पदे कसबा मतदार संघातील नगरसेवकांना देण्यात आली असली तरी ही पदे देताना ती बापट गटाकडे जाणार नाहीत याचीही दक्षता घेण्यात आली. त्यातच काकडे गटालाही दूर ठेवण्यात आले. पालिकेतील महापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या पदांच्या वाटपात प्रदेशाध्यक्षांचे वर्चस्व अधोरेखीत झाले असून पालिकेचा कारभारात आता ‘दादां’चे बारील लक्ष राहणार आहे. 

Web Title: Pune Municipal Corporation power in Chandrakant Patil hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.