रेल्वे उत्पन्नाची एक्सप्रेस सुसाट; पुणे विभागाच्या उत्पन्नात सहा टक्के वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 05:00 AM2020-01-14T05:00:00+5:302020-01-14T05:00:10+5:30

भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र असले तरी पुणे विभागाला सुगीचे दिवस..

Pune department railways income increased by six percent | रेल्वे उत्पन्नाची एक्सप्रेस सुसाट; पुणे विभागाच्या उत्पन्नात सहा टक्के वाढ 

रेल्वे उत्पन्नाची एक्सप्रेस सुसाट; पुणे विभागाच्या उत्पन्नात सहा टक्के वाढ 

Next
ठळक मुद्देया आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विभागाला सुमारे ८४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मागील वर्षभरात रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार सोडल्या विशेष गाड्या

पुणे : रेल्वे तोट्यात असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयाकडून केला जात असला तरी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे उत्पन्न मात्र वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विभागाच्या उत्पन्नात ६.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विभागाला सुमारे ८४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. हा आकडा २०१९-२० मध्ये ९०२ कोटी रुपयांवर गेला आहे. 
भारतीय रेल्वेला मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. ‘कॅग’नेही यावर ताशेरे ओढले होते. त्यामुळे तिकीट दरामध्ये वाढ करण्याचे संकेत रेल्वेकडून सातत्याने दिले जात होते. काही दिवसांपूर्वीच उपनगरी गाड्या वगळून अन्य गाड्यांच्या तिकीट दरात काही प्रमाणात वाढ केली. पण ही वाढ किरकोळ असल्याने प्रवाशांकडून त्याला विरोध झाला नाही. रेल्वेला प्रामुख्याने माल वाहतुकीतून खर्चाच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळते. तर तिकीट विक्रीतून तोटा होत असल्याचा दावा रेल्वेचे अधिकारी करतात. प्रवासी गाड्यांवरील एकुण खर्च व मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा अधिकाºयांकडून केला जातो. त्यामुळे प्रवाशांना सवलत न घेण्याचे आवाहन रेल्वेकडून केले जाते. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. असे असले तरी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत ६.२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. 
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ यावर्षी एप्रिल ते डिसेंबरदरम्यान पुणे विभागाला तिकीट विक्रीतून सुमारे ६३४ कोटी रुपये तर २०१९-२० मध्ये ६७३ कोटी रुपयांचा महसुल मिळाला. यामध्ये ६.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माल वाहतुकीमध्येही ५.३ टक्क्यांची वाढ दिसून येते. २०१८-१९ मध्ये १४८ कोटी रुपये महसुल जमा झाला होता. हा आकडा २०१९-२० मध्ये १५६ कोटींवर पोहचला. तिकीट तपासणीतून मिळणारा महसुलही सुमारे २ कोटी रुपयांनी वाढले आहे. तर एकूण महसुलात ६.२ टक्के म्हणजेच सुमारे ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 
--
मागील वर्षभरात रेल्वेने प्रवाशांच्या मागणीनुसार विशेष  गाड्या सोडण्यात येत आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही नवीन गाड्याही सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यामध्ये  पुणे ते मुंबईदरम्यानची वाहतूक अनेक दिवस विस्कळीत राहिली होती. त्यामुळे काही इंटरसिटी एक्सप्रेस सातत्याने रद्द कराव्या लागत होत्या. त्याचा मोठा फटका रेल्वेला बसला असला तरी महसुलात वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वेकडील ओढा वाढत असल्याचे यावरून स्पष्ट होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
......................

रेल्वेच्या पुणे विभागाला मिळालेला महसुल (एप्रिल ते डिसेंबर)
महसुल                              २०१८-१९                             २०१९-२०                        फरक (टक्के)
प्रवासी                        ६३४ कोटी ९५ लाख                 ६७३ कोटी ९१ लाख                ६.१
माल                          १४८ कोटी ७२ लाख                  १५६ कोटी ५५ लाख                 ५.
तिकीट तपासणी        १२ कोटी २० लाख                    १४ कोटी ४० लाख                ७.७
एकूण                        ८४९ कोटी ३७ लाख               ९०२ कोटी २० लाख                  ६.२

Web Title: Pune department railways income increased by six percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.