Pune Crime : लंडन फरार असलेल्या गायवळ टोळीचा शूटर अटकेत; घरातून तब्बल ४०० काडतुसे जप्त
By किरण शिंदे | Updated: December 2, 2025 20:57 IST2025-12-02T20:56:06+5:302025-12-02T20:57:24+5:30
गायवळ टोळीच्या गुंडाकडे सापडली ४०० काडतुसे

Pune Crime : लंडन फरार असलेल्या गायवळ टोळीचा शूटर अटकेत; घरातून तब्बल ४०० काडतुसे जप्त
पुणे - पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश गायवळ टोळीचा सक्रिय सदस्य अजय महादेव सरोदे याच्या घरात तब्बल ४०० काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. गुंड सरोदे याच्या अटकेनंतर कोथरूड पोलिसांनी केलेल्या घरझडतीत ही काडतुसे सापडली आहेत.
यातील २०० रिकाम्या पुंगळ्या, तर २०० जिवंत काडतुसे आहेत. १७ सप्टेंबर रात्री रात्री गायवळ टोळीने कोथरूड परिसरात १७ सप्टेंबरच्या रात्री गायवळ टोळीच्या गुंडांनी कोथरूड परिसरात एका तरुणावर गोळीबार केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटत दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करत खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही प्रकरणात गुन्हे झाल्यानंतर आरोपींवर मकोका कारवाई करण्यात आली आहे. टोळीचा प्रमुख नीलेश गायवळ सध्या लंडनला फरार असून त्याच्यावर लुकआऊट नोटिस जारी आहे.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अजय सरोदे घटनास्थळी हजर होता, असे तपासात निष्पन्न झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतरच्या चौकशीत त्याच्या घरातून तब्बल ४०० काडतुसे सापडली. स्वतः पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ही माहिती दिली.
दरम्यान सरोदे याच्याकडे परवानाधारक पिस्तुल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.. त्याला हा परवाना पुणे पोलिसांनी २९ जानेवारी २०२४ रोजी दिला होता.. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गायवळ टोळीचा नंबरकारी असतानाही त्याला परवाना मंजूर झालाच कसा असा प्रश्न उपस्थित होतोय. शस्त्र परवाना घेताना कोणी पोलिसांनी सरोदेची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली नाही का? कारण त्याच्यावर पूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान स्वतः सरोदे याने लोणावळ्यातील स्वतःच्या फार्म हाऊस जवळ आणि अहिल्यानगरच्या सोनेगाव परिसरात गोळीबाराचा सराव केल्याची कबुली दिली. निलेश गायवळ आणि त्याने गोळीबाराचा सराव केल्याचेही निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेली काडतुसे खडकी दारूगोळा कारखान्यातील असण्याची शक्यता आहे. ही काडतुसे त्याने कोणाकडून, कधी आणि कोणत्या मार्गाने मिळवली, याचा तपास पोलिस करत आहेत..