Pune Crime : मायलेकराच्या खूनप्रकरणी महत्वाची 'अपडेट'; आबिद शेख सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 09:28 PM2021-06-16T21:28:23+5:302021-06-16T21:32:24+5:30

पत्नी व मुलाच्या अशा दुहेरी खून प्रकरणातील पती आबिद शेख याच्यावरच पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत झाला आहे.

Pune Crime: Important 'update' in son and mother murder case; Husband Abid Sheikh showing in CCTV | Pune Crime : मायलेकराच्या खूनप्रकरणी महत्वाची 'अपडेट'; आबिद शेख सीसीटीव्हीत कैद

Pune Crime : मायलेकराच्या खूनप्रकरणी महत्वाची 'अपडेट'; आबिद शेख सीसीटीव्हीत कैद

googlenewsNext
ठळक मुद्देअजूनही बेपत्ता, मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे समोर

पुणे : धानारी परिसरात वास्तव्यास असलेल्या मायलेकराचा निर्घृण खून करुन त्यांचे मृतदेह सासवड व कात्रज घाटात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या दुहेरी खून प्रकरणातील पती आबिद शेख याच्यावरच पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत झाला आहे. त्यानेच दोघांचा खून करुन स्वत: पसार झाल्याचे आतापर्यंतच्या तपासावरुन निष्पन्न होत आहे. त्यामुळे आबिद शेख याचा शोध युद्धपातळीवर घेण्यात येत आहे.
सातारा रोडवर भाड्याने घेतलेली कार पार्क करुन रस्ता ओलांडून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये आबिद शेख कैद झाला आहे. तेथून तो कोठे निघून गेला, याचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी सासवड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयान शेख (वय ६) आणि आलिया शेख (वय ३५) असे खून झालेल्या मायलेकरांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, आबिद शेख हे मुळचे मध्य प्रदेशातील विदिशा येथील राहणारे आहेत. २००७ मध्ये नोकरीनिमित्ताने आबिद शेख पुण्यात राहायला आले होते. सध्या ते धानोरीतून चर्‍होलीमध्ये राहायला गेले होते. आबिद शेख हा एका विमा कंपनीत मॅनेजर आहे. आलिया शेख याही एका खासगी कंपनीत काम करत होत्या. मात्र, मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी अडीच वर्षांपूर्वी नोकरी सोडली होती. मुलगा ऑटिझमग्रस्त असल्याचे समजल्यानंतर कुटुंब तणावात होते. काही महिन्यांपासून मुलाला शिकविण्यासाठी घरी एक शिक्षिका ठेवण्यात आली होती. आलिया शेख यांचे वडील मध्यप्रदेशात वनाधिकारी होते. तर आबिद शेख यांचे वडील जिल्हा योजना अधिकारी होते. त्यांचा भाऊ कॅनडामध्ये असतो. आबिद आणि आलिया यांचा प्रेमविवाह झाला होता. सुरुवातीला त्यांच्या विवाहाला घरातून विरोध होता. मात्र वर्षभरानंतर तो मावळला होता. 

आबिद हा पत्नी आणि मुलाला घेऊन दर शनिवार, रविवार बाहेर फिरायला जात असत. सकाळी फिरायला गेलेले हे कुटुंब रात्री परत घरी येत होते. त्याप्रमाणे गेल्या शुक्रवारी ११ जून रोजी त्यांनी भाड्याने कार घेतली होती. दोन दिवसांसाठी घेतलेली कारची मुदत त्याने आणखी वाढविली होती. १४ जून रोजी आबिद कुटुंबाला घेऊन सासवड, दिवेघाट, बनेश्वर, बोपदेव घाट, दिवे घाटातून पुन्हा सासवडला गेला होता. तेथे त्याने रात्री साडेआठ -नऊच्या सुमारास गाडीतच आलियाचा खुन केल्याची शक्यता आहे. आलियाचा मृतदेह सासवड जवळील खळद गावानजिक या हॉटेलच्या बाजूला पोलिसांना सापडला. त्यानंतर त्याने गाडी पुन्हा कात्रज -दत्तनगर चौक, कात्रज नवा बोगदा येथे नेली. तेथे मुलाचा खुन करुन त्याचा मृतदेह टाकला असावा. त्यानंतर १५ जून रोजी मध्यरात्री एक वाजता त्याने गाडी सातारा रोडवर पार्क केली. त्यानंतर तो स्वारगेटच्या दिशेने चालत गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. 

विदिशातील नातेवाईकांनी त्याला १४ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फोन केला होता. त्यावेळी त्याने अर्धा तासात घरी पोहचतो, असे सांगितले होते. त्यानंतर त्याचा संपर्क झाला नाही. १५ जून रोजी त्याचा संपर्क होऊ शकत नव्हता. तेव्हा  विदिशातील नातेवाईकांनी ही बाब पुण्यात राहणार्‍या त्यांच्या चुलत भावाला सांगितली. ते शेख यांच्या घरी गेले तर तेथे घराला कुलूप आढळले. 

अबिद शेख यांना भाड्याने कार देणार्‍या कंपनीचे अधिकारीही तेथे आले होते. त्यांचाही शेख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटी त्यांनी कारवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तिचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती कार सातारा रोडला पार्क केली असल्याचे आढळून आले. गाडीत मुलाचे कपडे व खाण्याचे साहित्य होते. मागील सीटवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत होते. आलियाच्या शवविच्छेदन अहवालात जबर मारहाण केल्याने व आयानच्या शवविच्छेदनात गळा दाबून मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. 

.....
आबिद याच्यावर संशय
हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आबिद यानेच दोघांचा खुन करुन स्वत: पळून गेल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे पोलिसांनी सर्व लक्ष आबिद याचा शोध घेण्यावर केंद्रीत केले आहे. हा संपूर्ण प्रकार पाहता आबिद शेख यानेच हा प्रकार केल्याचा संशय आहे. मात्र, जोपर्यंत तो प्रत्यक्ष भेटत नाही. तोपर्यंत या खुनांमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त.

........

मध्य प्रदेशातील दोघांचेही नातेवाईक आज रात्रीपर्यंत पुण्यात येण्याची शक्यता

सध्या तरी पोलिसांचा मुलाच्या वडिलांवर संशय आहे. सातारा रोडवर गाडी पार्क करुन तो निघून गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. अन्य ठिकाणी तो दिसून येतो का तसेच तो कोठे निघून गेला याबाबत तांत्रिक विश्लेषण करुन माहिती काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्य प्रदेशातील दोघांचेही नातेवाईक आज रात्रीपर्यंत पुण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यातून काही माहिती मिळते का हे पडताळून पाहण्यात येईल. 
अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर

 

Web Title: Pune Crime: Important 'update' in son and mother murder case; Husband Abid Sheikh showing in CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.