पुणे कोर्टाकडून दारुड्यांना आगळीवेगळी शिक्षा; दररोज ४ तास करावे लागणार 'हे' काम
By किरण शिंदे | Updated: December 9, 2025 21:02 IST2025-12-09T21:02:14+5:302025-12-09T21:02:58+5:30
पुण्यात कोर्टाकडून प्रथमच ‘कम्युनिटी सर्व्हिस’ची शिक्षा

पुणे कोर्टाकडून दारुड्यांना आगळीवेगळी शिक्षा; दररोज ४ तास करावे लागणार 'हे' काम
Pune Court: पुण्यात शिवाजीनगर कोर्टाने पहिल्यांदाच ‘कम्युनिटी सर्व्हिस’ (सामुदायिक सेवा) स्वरूपाची शिक्षा सुनावत एक महत्त्वाचा व दखलपात्र निर्णय दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरवर्तन करणाऱ्यांच्या बाबतीत हा निर्णय देण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना कोर्टाने तुरुंगात न धाडत ४ दिवस दररोज ३ तास पोलिसांच्या देखरेखीखाली सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ३ डिसेंबरच्या रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना पुणे महापालिका इमारतीजवळ सार्वजनिक ठिकाणी दोन तरुण मद्यपान करून गैरवर्तन करताना आढळले. विनोद वसंत माकोडे (वय ३२, रा. सांगवी खुर्द, अकोला) आणि सागर रामकृष्ण बोदाडे (वय ३६) अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांचे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर विक्रमसिंह भंडारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, शिवाजीनगर कोर्ट, पुणे यांनी आरोपींना तुरुंगात पाठवण्याऐवजी सामुदायिक सेवेची शिक्षा दिली. त्यामुळे या दोघांनाही आता ४ दिवस दररोज ३ तास पोलिसांच्या देखरेखीखाली सामुदायिक सेवा (कम्युनिटी सर्व्हिस) करावी लागणार आहे. ही शिक्षा महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग-४-क (दि. २८/११/२०२४) नुसार देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ महेश बोलकोटगी आणि त्यांच्या पथकाने केली.