‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:17 PM2019-08-22T12:17:27+5:302019-08-22T12:18:34+5:30

लहानमोठे सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना शिवसेनेच्या शहरपातळीवर मात्र स्मशानशांतता आहे.

pune city Shiv Sena in confusion after evacuated by 'Matoshree' | ‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत

‘मातोश्री’कडून बेदखल झालेली शहर शिवसेना संभ्रमावस्थेत

Next
ठळक मुद्देपदाधिकारी-कार्यकर्ते निवांत

पुणे: सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह लहानमोठे सगळेच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असताना शिवसेनेच्या शहरपातळीवर मात्र स्मशानशांतता आहे. कोणता मतदारसंघ मिळणार याविषयी अनिश्चितता असल्याने स्थानिक इच्छुक नेत्यांसह त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमावस्थेतच आहे. शिवसेनेच्या कामावर याचा परिणाम होत असून गेल्या काही महिन्यांमध्ये शिवसेनेचे एकही जाहीर कार्यक्रम शहरात झालेला नाही.
त्यातच संपर्कप्रमुख आमदार बाळा कदम यांनी लोकसभा निवडणुकीनंतर तातडीने शहर प्रमुखाची दोन्ही पदे बरखास्त केली. त्या पदांवर काम करत असलेल्या चंद्रकांत मोकाटे व महादेव बाबर या माजी आमदारांना त्याची पुर्वकल्पनाही दिली गेली नाही. त्यांना पदावरून दूर करून आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र युतीमध्ये कोणता मतदारसंघ वाट्याला येणार याची काहीच कल्पना नसल्याने तेही निवांत झाले आहेत. 
शहरातील ६ व बारामती लोकसभेला खडकवासला तसेच मावळला लोकसभाला जोडलेला हडपसर विधानसभा मतदारसंघ असे आठही विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपाच्या ताब्यात आहेत. सन २०१४ ची निवडणूक भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढले, त्यात शिवसेनेला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागला. युती नसल्यामुळे तरीही शिवसेना पक्ष म्हणून जोरात होती, याचे कारण स्वतंत्रपणे लढणार असल्याने सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या होती. मात्र, त्यानंतर लोकसभेत दोन्ही पक्षांची युती झाल्यामुळे आता कोणता विधानसभा मतदारसंघ वाट्याला येणार याची शिवसैनिकांना कसलीही माहिती नाही.
किमान तीन मतदारसंघ, मागील वेळी दुसऱ्या क्रमाकांवर असलेले मतदारसंघ, युती करून लढलेलो असताना ताब्यात असलेले मतदारसंघ द्यावेत अशी वारंवार मागणी करून एकदाही भाजपाने स्थानिक किंवा वरिष्ठ स्तरावर त्याची साधी दखलही घेतलेली नाही. उलट भाजपाचे बहुसंख्य स्थानिक कार्यकर्ते व नेतेही ‘ज्या जागांवर ज्यांचे आमदार आहेत, त्या जागा कायम ठेवून उर्वरित जागांचेच वाटप होणार’ असेच सांगत आहेत. याच प्रकारे जागा वाटप होणार असल्याचे लोकसभेसाठी युती करतानाच नक्की झाले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक शिवसैनिकांनाही त्यांच्याकडून सातत्याने तसेच सांगितले जाते.

......
मध्यंतरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ प्रमुखांची मुंबईत बैठक घेतली. त्यात पुण्यातील प्रमुखांनी किमान दोन तरी मतदारसंघ मिळावेत अशी मागणी केली. त्यावर ठाकरे यांनी पुण्याने आतापर्यंत शिवसेनेला काय दिले, अशी संतप्त विचारणा केल्याची चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे. त्याचबरोबर नगरसेवकांची संख्या फक्त १० कशी झाली, नेते करतात काय, पक्षवाढीसाठी काहीच प्रयत्न कसे केले जात नसतील तर मग एक-दोन जागा घेऊन त्या गमवायच्या काय, अशा प्रश्नांची सरबत्तीच ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाºयांवर केली. त्यामुळेच निवडणूक लढवायला मिळणार की नाही अशी शंका शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.

......

पदाधिकारी-कार्यकर्ते निवांत

शिवसेनेला पुण्यात एकही जागा देऊ नये, हीच शहर भाजपाची इच्छा आहे. महापालिकेच्या सत्तेतही भाजपाने शिवसेनेला सामावून घेतले नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मात्र बरोबर घेत त्यांना ५ जागा देऊन त्या स्वत:च्या चिन्हावर निवडून तर आणल्याच शिवाय त्या बदल्यात त्यांना उपमहापौरपदही दिले आहे.

Web Title: pune city Shiv Sena in confusion after evacuated by 'Matoshree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.