IndiGo Flight Crisis: प्रवाशांचे हाल थांबेना..! इंडिगोची सेवा पाचव्या दिवशीही ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 10:56 IST2025-12-09T10:56:04+5:302025-12-09T10:56:28+5:30
IndiGo Pune Flight Crisis: इंडिगोची सेवा सुरळीत होण्यास वेळ लागणार

IndiGo Flight Crisis: प्रवाशांचे हाल थांबेना..! इंडिगोची सेवा पाचव्या दिवशीही ठप्प
पुणे : पुणे (लोहगाव) विमानतळावर सोमवारी (दि. ८) दिवसभरात इतर सर्व विमान कंपन्यांचे उड्डाणे वेळेत झाली. मात्र, इंडिगो एअरलाइन्सची १५ विमानांचे आगमन आणि १४ विमानांचे उड्डाणे मात्र रद्द झाली आहेत. त्यामुळे पुणे विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या आणि आगमन होणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सची सेवा अजूनही विस्कटलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या सततच्या व्यत्ययांमध्येदेखील सुरळीत कामकाज आणि प्रवाशांना मदत मिळावी यासाठी पुणे विमानतळ प्रशासन सातत्याने समन्वय साधत आहे.
सोमवारी लोहगाव विमानतळावरून दिल्ली, बंगळुरू, पटना, नागपूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकता, इंदोर, डेहराडून या शहरांसाठी जाणारी आणि पुण्यात येणारी विमाने रद्द झाली तर, काही शहरांसाठी विमाने चार ते पाच तास उशिराने उड्डाण केली. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.
विमान कंपन्यांकडून लगेज गहाळ केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून केल्या जात आहेत. अनेक प्रवाशांना तीन ते चार दिवस झाले तरी त्यांचे लगेज परत मिळालेले नाही. तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. विमानतळावरील सर्व सेवा सुरळीत ठेवण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्न करत आहे, असे पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.
उड्डाणे रद्द करणे (आगमन/निर्गमन)
- एअर इंडिया : ००/००
- अलायन्स एअर : ००/००
- इंडिगो : १५/१४
- स्पाइसजेट : ००/००
- एआयएक्स : ००/००
- अकासा एअर : ००/००
- स्टार एअर : ००/००
- फ्लाय ९१ : ००/००