The pollution in the Ujani water increased | उजनीला प्रदूषणाचा विळखा पाण्याचा रंग  हिरवा, परिसरात दुर्गंधी
उजनीला प्रदूषणाचा विळखा पाण्याचा रंग  हिरवा, परिसरात दुर्गंधी

योगेश कणसे
पुणे : उजनी धरणातील पाण्याच्या प्रदूषणाचे शुक्लकाष्ट संपता संपत नसून, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण पूर्ण भरले आहे. मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा रंग प्रदूषणामुळे हिरवा झाला आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असून त्याचा त्रास जलाशयाच्या किनारी राहणाºयांना गावांना सहन करावा लागत आहे.
धरणाच्या जलाशयातील संपूर्ण पाण्यावर हिरव्यागार रंगाचे जणू आच्छादनच झाले आहे. या परिणाम  जलाशयात चालणाºया मासेमारीवर झाला आहे. पाण्यात अंग भिजल्यानंतर अंगाला खाज सुटत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे असून सध्या मासळी बाजारभाव तेजीत असताना जाळ्यात मासेही कमी सापडत असल्याने मच्छीमारही हवालदिल झाले आहेत.
उजनी जलाशयावर हक्काचा पाहुणचार झोडण्यासाठी दर वर्षी न चुकता येणारे रोहित, चित्रबलाक या वर्षी आॅक्टोबर महिना संपून नोव्हेंबर उजाडला, तरी अद्यापही उजनीकडे फिरकले नाहीत. उजनी जलाशयातील वाढत्या प्रदूषणाने परदेशी स्थलांतरित पक्षी कायमची पाठ फिरवण्याचा धोका जलाशायाच्या प्रदूषणामुळे निर्माण झाला आहे.
      उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील उजनी धरणामुळे विस्थापित झालेल्या अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांचे जलोद्भव असून दूषित झालेल्या पाण्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उजनी जलाशयातील पाण्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी होतो. वारंवार असे दूषित पाणी पिकांना दिल्याने शेतमालासह शेतजमिनीच्या पोतावर त्याचा दूरगामी परिणाम होत आहे. दूषित पाण्यामुळे शेतजमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. ४० वर्षांपूर्वी  उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यावर काही वर्षे जलाशयालगत राहणारे लोक व मच्छीमार पिण्यासाठी वापरत असत. मात्र, आता उजनी जलाशयाचे पाणी प्रदूषणाने हातात घेण्याच्याही लायकीचे राहिले नसल्याचे अनुमान जलतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

        गतवर्षी दुष्काळात उजनी धरणाच्या इतिहासात प्रथमच पाणीपातळी एकदमच खालावली. ११० टीएमसी इतकी क्षमता असलेल्या धरणात केवळ उणे ३९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरले. आजही पाण्याचा साठा शंभर टक्के आहे. पंचाहत्तर टक्के पाणी उजनीत नव्याने आले; शिवाय ५० टीएमसीहून अधिक पाणी अतिरिक्त झाल्याने वाहून गेले, तरीही उजनीतील  पाणी आज हिरवा तवंग पसरून कमालीचे प्रदूषित झाले आहे.

       या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीच्या खोºयात मोठे औद्योगिकीकरण झाले. अनेक मोठ्या शहरांच्या सांडपाण्याचे विसर्जन या पाणलोट क्षेत्रातील नद्यांत होत आहे. या मैलामिश्रित सांडपाण्याबरोबरच औद्योगिक कंपन्यांचीही टाकाऊ रसायने पर्यायाने उजनीच्या पाण्यात मिसळत आहेत. या प्रदूषणाने उजनी धरणाच्या पाण्यात आढळणाºया जैवसाखळीतील महत्त्वाच्या अनेक पाणवनस्पती नामशेष झाल्या आहेत. याचा मोठा फटका पाण्यातील जलचरांना बसला असून गोड्या पाण्यात पूर्वी आढळणाºया माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. आज अपवादाने एखादादुसरा माशाची जात आढळून येते. त्याचे सापडण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असून, घाण पाण्यात जो सर्वाधिक ‘तिलापी’ मासा ज्याचे प्रचलित नाव चिलापी आहे, तो उजनीत मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच उजनी धरणाच्या पाण्यातील वाढत्या घातक प्रदूषणाने उजनीतील जैववैविध्यावर दूरगामी परिणाम झाला आहे. यामुळे अनेक जाती-प्रजातींचे पक्षी उजनी धरणाच्या जलाशयाकडे पाठ फिरवू लागले आहेत.

Web Title: The pollution in the Ujani water increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.