उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलं! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि उजनी बचाव समितीत जोरदार खडाजंगी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:45 PM2021-05-11T14:45:14+5:302021-05-11T14:46:25+5:30

इंदापूर, सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होणार नाही... दत्तात्रय भरणे खोटे बोलत असल्याचा उजनी बचाव समितीचा आरोप 

Politics heats up on Ujani water! Dispute between Minister Dattatray Bharane and Ujani Bachao Samiti | उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलं! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि उजनी बचाव समितीत जोरदार खडाजंगी...

उजनीच्या पाण्यावरून राजकारण तापलं! राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि उजनी बचाव समितीत जोरदार खडाजंगी...

Next

पुणे : सध्या उजनीच्या पाण्यावरून राजकारण सुरू आहे. पण इंदापूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिक आणि शेतक-यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री व जलसधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

उजनी धरणातील पाण्यावरून सोमवार (दि.10) रोजी सिंचन भवन येथे बैठक झाली व बैठकीत गोंधळ झाला. उजनी धरणामधून पाच टीएमसी पाणीइंदापूर तालुक्यातील 23 गावांना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. याच्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी एकत्र आले असून, त्यांनी उजनी बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीने इंदापूर तालुक्यास पाणी देण्यास विरोध केला आहे. याबाबत सोमवारी सिंचन भवन येथे या समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच इंदापूर तालुक्यातील शेतकरी यांची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उजनी बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुक्याचे नेते प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. 

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना भरणे म्हणाले, उजनीमधील मूळ पाण्याला कोणताही धक्का लावला जाणार नाही. मात्र, इंदापूर तालुक्याला मिळणा-या पाण्याबाबत काही जणांचा गैरसमज झाला आहे, तो दूर करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. उजनी बचाव समितीमधील पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. मात्र, पुणे शहराची पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे खडकवासला धरणामधून इंदापूर तालुक्यास योग्य तेवढे पाणी मिळत नाही. इंदापूर तालुका हा टेलला आहे, त्यामुळे कायमच पाण्याची कमतरता असते. त्यासाठी केवळ पुण्यातून येणा-या सांडव्यातून हे पाणी उचलण्यात येणार आहे.

उजनीच्या मूळ पाण्याच्या वाटप धोरणात कोणताही बदल करता येत नाही. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्याच्या अनेक योजना आहेत, मात्र या योजना निधीअभावी ब-याच वर्षांपासून पूर्ण झाल्या नाहीत. आता मात्र या योजना येत्या दहा महिन्यांत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच या योजनांच्या पूर्णत्वासाठी राज्य शासनाकडे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तर इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पाण्याबाबत दोन्ही भागातील शेतकऱ्यायांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
------------------------------------
बैठकीत असा झाला गोंधळ 
उजनी धरणातील पाणी प्रश्नावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे अधिकारी आणि तेथील स्थानिक शेतकरी यांच्यात बैठक झाली. मात्र, पाणी प्रश्नावर काही मुद्द्यांवर भरणे यांच्यारसमोरच सोलापूर आणि इंदापूर येथील शेतकर्‍यांची शाब्दिक चकमक झाली आहे. यामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
------------

दत्तात्रय भरणे खोटे बोलताहेत....

सोलापूरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री दत्तात्रय भरणे खोटे बोलत असून, समितीमध्ये कोणताही निर्णय झाला नाही. त्यांनीच सोलापूरचे पाणी पळविले आणि इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांमधे भांडणे लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप उजनी बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

गेल्या काही दिवसांपासून उजनीच्या पाण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देण्यात येणार आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी एकत्र येऊन त्यांनी उजनी बचाव समिती स्थापन केली आहे.

खुपसे म्हणाले, उजनीमधून इंदापूर तालुक्याला पाणी पळविण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हाणून पाडणार आहे. सोलापूर जिल्हा तसेच शहरात पाणी मोठ्या प्रमाणावर अडचण आहे. याबाबत नवीन लवाद बसविण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. मात्र, बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी गोलमाल करणारी उत्तरे दिली आहेत. तसेच, अधिकार्‍यांना पाण्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी अत्यंत चुकीची उतरे देऊन वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Politics heats up on Ujani water! Dispute between Minister Dattatray Bharane and Ujani Bachao Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.