तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:41 PM2020-05-25T20:41:04+5:302020-05-25T21:00:05+5:30

पोलिसांवरील ताण होणार कमी : संपर्काचा धोका टळणार

Police keep an watch on Tadipar criminals through 'face reading app' | तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार

तडीपार गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप'द्वारे पोलिसांची नजर; कोरोनाचा संभाव्य धोका देखील टळणार

Next
ठळक मुद्देतडीपार केलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची देखील काळजी या अ‍ॅपचे कामकाज अंतिम टप्प्यात असून,पुढील काही दिवसात ते कार्यान्वित करण्यात येणार

पुणे : शहरातून तडीपार केल्यानंतरही शहरात येऊन गुन्हे करणाऱ्या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नजर ठेवावी लागत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुन्हेगाराच्या घरी जाऊन चेकिंग करणे अवघड होऊ लागल्याने आता शहर पोलीस अशा सराईत गुन्हेगारांवर 'फेस रिडिंग अ‍ॅप' द्वारे नजर ठेवणार आहे. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी होणार आहे.  तसेच कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी झाला आहे. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यासाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.  त्यात काही तांत्रिक बदल करुन आता त्याचा उपयोग गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी केला जाणार आहे.
तडीपार गुन्हेगारांना दररोज किंवा पोलीस सांगतील तेव्हा तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा फोटो त्याच्याकडील मोबाईलवरुन अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागेल. त्याने फोटो अपलोड केल्यानंतर जीपीएस द्वारे पोलिसांना त्याचे लोकेशन कळेल. तसेच फोटो अपलोड केल्यानंतर तो शहरात आला तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना समजेल. त्यामुळे त्याला पकडणे सोपे जाणार आहे. कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र होमक्वरांटाईन केलेल्या व्यक्ती नियमांचे उल्लंघन करून बाहेर पडत असल्याचे दिसून आले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी
पोलिसांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एच.क्यु.टी.एस. (होम क्वाराटाईन ट्रॅकिंग सिस्टीम) हे अ‍ॅप तयार केले. त्यामध्ये फेस रेडिंग व जीपीएस सुविधेची मदत घेण्यात आली होती. क्वाराटाईन केलेल्या व्यक्तीसत्याच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्या व्यक्तीनेदररोज ठरवून दिलेल्या जागेवर जाऊन फोटो काढून (सेल्फी) तो अपलोड करायला सांगितला जात होता. त्यामुळे पोलिसांना जीपीएसच्या मदतीने ती व्यक्ती घरात आहे की नाही हे समजत होते. त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना खूपच मदत झाली होती. या अ‍ॅपचा आता तडीपार गुंडावर लक्ष ठेवण्यासाठी वापर करण्याचे पोलिसांनी ठरविले आहे.शहर पोलीस दलाकडून सराईत गुन्हेगारांना एक ते दोन वर्षे तडीपार केले जाते़, त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात सोडले जाते. मात्र अनेक गुंड तडीपारीचा भंग करुन शहरात येऊन गुन्हे करत असतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिसांना त्यांच्या घरी जाऊन करावे लागते़ हे काम आता सोपे होणार आहे.
तडीपार केलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली आहे. या अ‍ॅपचे कामकाज अंतिम टप्प्यात असून,पुढील काही दिवसात ते कार्यान्वित करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे अ‍ॅप सुरू करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी काम करत आहेत.

Web Title: Police keep an watch on Tadipar criminals through 'face reading app'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.