अबब... अडीच हजारांचा एक खड्डा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:10 PM2019-08-07T12:10:00+5:302019-08-07T12:12:24+5:30

महापालिकेच्या ‘दर्जेदार’ कामाचे नमुने असलेले हे खड्डेसुद्धा तेवढेच ‘महाग’ ठरत आहेत...

a pit of two and a half thousand! | अबब... अडीच हजारांचा एक खड्डा !

अबब... अडीच हजारांचा एक खड्डा !

Next
ठळक मुद्देकराचा पैसा खड्ड्यात : पथ विभागाकडून खड्डे बुजविण्यासाठी ५२ लाखांचा खर्च

- लक्ष्मण मोरे- 
पुणे : पावसाच्या तडाख्यात शहरभरातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा उघड झाला असून जागोजाग खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. महापालिकेच्या ‘दर्जेदार’ कामाचे नमुने असलेले हे खड्डेसुद्धा तेवढेच ‘महाग’ ठरत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत शहरातील २२०० खड्ड्यांवर पथ विभागाकडून तब्बल ५२ लाखांचा खर्च करण्यात आला असून पालिकेला एक खड्डा २ हजार ३६३ रुपयांना पडला आहे. पालिकेने पावसाळ्यातही खड्डे बुजविण्यासाठी आणलेल्या केमिकल्सयुक्त काँक्रिटचाही फज्जा उडाला असून पाण्यासोबत करदात्यापुणेकरांचा पैसाही खड्ड्यांमध्ये जिरू लागल्याचे चित्र आहे. अद्यापही लाखो खड्डे रस्त्यावर असून त्यावर पालिका किती पैसा जिरवणार, असा प्रश्न आहे.


महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून पहिल्यांदाच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून रान पेटले आहे. शहरातील रस्त्यांवर पाणी कमी आणि खड्डेच अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे. चक्क महापालिकेच्या मुख्य आणि नवीन इमारतीसमोरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. पालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंटीकरण आणि अन्य कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, एवढी मोठी तरतूद करूनही कामाचा दर्जा मात्र सुमारच राहिल्याचे चित्र समोर आले आहे. 
रस्त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने डांबरीकरण न केल्याने पावसाळ्यापूर्वी अंथरलेला डांबर आणि खडीचा थर पावसाच्या सपाट्यात वाहून गेला आहे. जवळपास सर्वच रस्त्यांवर जागोजाग पाण्यामुळे उखडून आलेली खडी पसरलेली दिसते आहे. या खडीमुळे दुचाकी वाहने घसरून छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते हा भाग निराळाच. खड्ड्यांवरून आरडाओरड सुरू झाल्यावर आतापर्यंत महापौर मुक्ता टिळक यांनी दोन वेळा पथ विभागाच्या अधिकाºयांची कानउघाडणी करीत शहरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. पथ विभागाकडून खड्डे बुजविण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. 
यासोबतच सतत पडत असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये टाकलेल्या काँक्रिटचा उपयोग होत नसल्याचेही स्पष्टीकरण देण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकरांचा कररुपाने आलेला पैसा खड्ड्यांमध्ये जिरवला जातोय की काय, अशीच शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. जूनपेक्षाही जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. जुलै महिन्यात रस्त्यांवरील खड्डेही वाढले. पथ विभागाने १५ जुलै ते २५ जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत १७९० खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा केला आहे, तर आतापर्यंत एकूण २२०० खड्डे बुजविल्याचे सांगण्यात आले. 
...
* पावसातही खड्डे भरता यावेत यासाठी कॅटेनिक इमल्शन, कोल्ड मिक्स, केमिकल काँक्रिट आणि १०० एमएमचे पेव्हर ब्लॉक्स याचा वापर केला जात आहे. 

* ठेकेदार आणि पालिकेच्या पथ विभागाकडून या गोष्टींचा वापर करून खड्डे भरण्यात येत आहेत; परंतु आतापर्यंत भरलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने या सर्व गोष्टींचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
...

* नवनवीन गोष्टी पुढ्यात आणून खर्चाचे आकडे फुगविण्यात वाकबगार झालेल्या यंत्रणेचा ‘इंटरेस्ट’ खड्डे बुजविण्यात आहे की ठेकेदारांचे हित जपण्यात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
............
पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत २२०० खड्डे बुजविण्यात आले असून खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत ५२ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. खड्डे बुजविण्यासाठी कॅटेनिक इमल्शन, कोल्ड मिक्स, केमिकल काँक्रिटसह १०० एमएमच्या पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे; परंतु पावसामुळे हे केमिकल सुकत नसल्याने अडचणी येत आहेत. - अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग
.......
ही डागडुजी तात्पुरती आहे. आतापर्यंत किती खड्डे बुजविले, शहरात नेमके किती खड्डे आहेत, याची आकडेवारीच प्रशासनाकडे नाही. सुरुवातीला रस्त्यांची कामे वाईट केली. आता खड्ड्यांवर खर्च होतोय. हा खर्च पावसाळा संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यानंतर पुन्हा पक्क्या कामासाठी खर्च केला जाईल. अशा प्रकारे एकाच कामासाठी तीन-तीन वेळा पैसे खर्च करण्याचे काम अधिकारी करीत आहेत. पुणेकरांचा पैसा खड्ड्यांत घालण्याचे काम अधिकारी इमाने-इतबारे करीत आहेत. - विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच
...
 

Web Title: a pit of two and a half thousand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.