.... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 09:55 PM2020-05-19T21:55:01+5:302020-05-19T21:55:22+5:30

आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी..

.... only then ‘family’ lockdown happiness ..! | .... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

.... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

Next

आमच्या शेजारी राहणा-या आजी रात्री मला फोनवर सांगत होत्या कि, बघ ना,नातीने आत्ता रात्री आठ वाजता वॉशिंग मशीन लावलंय, आणि कानात इअरफोन अडकवून तो लॅपटॉप समोर घेऊन बसलीय.आता रात्री अपरात्री धुणं वाळत घालेल. काळ वेळेचं काही भान नाही. आजींचा त्रागा ऐकून मी म्हटले,आजी, तुम्ही दुर्लक्ष करा... ते एवढं सोप्प आहे?  
आज ' लॉकडाऊन 'मुळे सध्या सगळी मंडळी घरीच आहेत.एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणं हे भाग्य असले तरी सदासर्वकाळ एकत्र राहाण्याने काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेत. ताणाच्या या परिस्थितीत एकमेकांच्या उणिवा प्रकर्षांने समोर येत आहेत.या काळात आपल्या सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे..
आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी असे म्हणावेसे वाटते... 
 आज घरातल्या गृहिणीवर अतिरिक्त ताण आलाय. ती तिच्या ऑफिसचे काम घरुन करत असेल तर तिला दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहावे लागतयं. पण ती केवळ गृहिणी असेल तरी तिचे काम वाढलेले आहेच कारण कामवाल्या बायका आज मदतीला नाहीत. त्यामुळे घरात कामाच्या वाटणीला पर्याय नाही, हे सत्य आहे. प्रत्येकाने समजून उमजून आपली जबाबदारी ओळखून कामाचा वाटा उचलायला हवा.
महत्वाचे हे की कामांची एकदा वाटणी झाली की परस्परांनी त्यात ढवळाढवळ करायची नाही. हे ठरवून टाका. नवरा,मुलं यांना कामं सोपवून दिली की ते त्यांच्या पध्दतीने करतील. फारतर एकदा आठवण करुन द्यायला हरकत नाही. पण ती कामं पूर्ण करायची त्यांची जबाबदारी हे एकदा ठरवून टाकायचे. घरात पसारा पडलाय.कोण येतयं आता घरी? म्हणून तिकडे कोणाचेच लक्ष नाही.आपण केवळ त्रागा करुन उपयोगी नाही. मुलांना चारवेळा पसारा आवरा सांगायचे, ती आपलं ऐकत नाहीत. चिडचिड करण्याखेरीज काहीच होत नाही. मग शेवटी आपणच उचलून ठेवतो. त्यापेक्षा आधीच उचलला असतां तर? चिडचिड त्रागा वाचला असता.वातावरण देखील डिस्टर्ब झालं नसतं. हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही हे मला मान्य आहे.

पण आत्ता या दिवसात आपल्याला मानसिक शांतता हवी आहे. त्यासाठी हा एक लहानसा प्रयत्न आहे. कारण आत्ता घरात नसते वादविवाद नको आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे काही दिवस थोडे फार दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? भांडी अगदी लखलखीत स्वच्छ नाही निघाली, धुणं नीट न झटकता वाळत घातले गेले? तर फारसं काही बिघडत नाही. त्यामुळे तिकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे केव्हाही श्रेयस्कर.
दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असण्याचा. हातात वेळ आहे दुसरं काही काम नाही म्हणून सतत कोणता ना कोणता तरी स्क्रिन डोळ्यांसमोर असणं हे तितकेसे बरं नाही. घरातल्या मंडळींशी गप्पा टप्पा न मारता केवळ आभासी जगात रमणं तितकेसे बरोबर नाही. दिवसातला काही ठराविक काळ तरी एकत्र घालवा. चहा,नाष्टा,जेवण,चॅनल्स वरील एखादी मालिका सगळ्यांनी मिळून पहा. त्यांवर चर्चा करा.
या सगळ्या बरोबर अजून एक महत्त्वाचे ते म्हणजे स्वताचा स्वताशी संवाद असणं आवश्यक. आपल्याला आवडेल ती गोष्ट मग ते वाचन असो की शिवणकाम, लिखाण यांसह काहीही असो,आपल्या आवडीचे काहीही आवर्जून करणे व त्यासाठी वेळ देणे महत्वाचे. हाताशी वेळ आहे तर नवनवीन गोष्टी करुन बघतां येतील. जुन्या काही गोष्टी आठवून बघा. पूर्वी कामाच्या व्यापात, संसाराची जबाबदारी निभावताना जे काही आवडीचे करायचे राहून गेले आहे ते पुन्हा सुरु करता येईल.त्या निमित्ताने आपली बकेट लिस्ट पुन्हा एकदा नव्याने तयार करता येईल. 
स्वत:ची आवड, एकटेपणा जपायला हवा. तरच हे दिवस आनंदाचे, शांततेचे जातील. आणि पर्यायाने पुढीलकाळात देखील कौटुंबिक स्वास्थ जपले जाईल.

- अ‍ॅड. भाग्यश्री चौथाई 

Web Title: .... only then ‘family’ lockdown happiness ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.