शासकीय जमीन दस्तनोंदणी प्रकरणी अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:14 IST2025-11-14T06:14:33+5:302025-11-14T06:14:52+5:30
Pune News: पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेलीसह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले.

शासकीय जमीन दस्तनोंदणी प्रकरणी अधिकारी निलंबित
मुंबई/पुणे - पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथील हवेलीसह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात आले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षकांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. पुण्याजवळील मौजे ताथवडे, ता. मुळशी येथील सर्व्हे क्र. २० मधील एकूण ६ हे ३२ आर जमिनीच्या खरेदीखत दस्त क्र. ६८५/२०२५ च्या नोंदणीत ही अनियमितता झाली आहे. या जमिनीवर पशुसंवर्धन आयुक्तांचा ताबा असून, शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी असलेली मालमत्ता आहे. दस्तनोंदणीच्या वेळी, बडे यांनी अद्ययावत किंवा नजीकच्या कालावधीतील सातबारा उतारा जोडण्याची बाब दुर्लक्षित केली.
‘स्किप’ पर्याय वापरून दस्त नोंदणी
दस्त नोंदणीच्या तारखेस लागू असलेला सातबारा तपासला असता, तर त्यावर ‘शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी’ हा प्रतिबंधात्मक शेरा दिसला असता आणि दस्त नोंदणी नाकारता आली असती.
उताऱ्यावरील मालक मयत असताना आणि वारसांची नोंद नसतानाही, तांत्रिक अडचणीचे कारण देत ‘स्किप’ पर्याय वापरून दस्त नोंदणी पूर्ण करण्यात आली. यासाठी त्यांनी वरिष्ठांची कोणतीही परवानगी घेतली नाही, याशिवाय काही अनियमितता करून व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी म्हटले आहे.