Observation of Metro works for passenger safety | प्रवासी सुरक्षेसाठी मेट्रोच्या कामाची पाहणी

प्रवासी सुरक्षेसाठी मेट्रोच्या कामाची पाहणी

ठळक मुद्देमेट्रोच्या बांधणीपासून ते गाडीचा वेग किती असावा या प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने पाहणी

पुणे: मेट्रोच्या सुरक्षा विभागाचे दिल्लीस्थित आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी  पुणेमेट्रोच्या कामाला भेट देऊन प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. सुरक्षा विभागाच्या वतीने मेट्रोच्या कामाची अशी प्रथमच पाहणी करण्यात आली.  
मेट्रो च्या सर्वच प्रकल्पांमध्ये प्रवासी सुरक्षेसाठीच्या तरतुदी अत्यंत कडक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र आयुक्त कार्यालय आहे. ज्याठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे तिथे या विभागाकडून काम सुरू असतानाच भेट दिली जाते व कामाची पाहणी केली जाते. त्याशिवाय काम पुर्ण झाल्यावर मेट्रो सुरू करताना व विशेष म्हणजे मेट्रो सुरू झाल्यानंतरही या विभागाची पाहणी होत असते व त्यांच्याकडून वेळोवेळी सुचना केल्या जातात व प्रमाणपत्रही दिले जाते.  
गर्ग यांनी गुरूवारी त्यांच्या काही अधिकाऱ्यांसमवेत मेट्रो मार्गाची तसेच वनाज व रेंजहील येथील डेपोंची, पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेल्या कामाची, कृषी महाविद्यालयाजवळ सुरू असलेल्या भूयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना त्यांनी काही सुचनाही केल्या, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. मेट्रोच्या पुणे विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. गर्ग यांनी कामाबद्धल समाधान व्यक्त केले. मेट्रो मार्ग, विद्यूत शक्तीसाठीच्या तारा, स्थानकांचे सध्या सुरू असलेले काम, वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते बोपोडी या प्राधान्य मार्गाचे काम याबाबत गर्ग यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.   
मेट्रोच्या एकूणच कार्यपद्धतीत प्रवासी सुरक्षेला अत्यंत महत्व दिले गेले अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, मेट्रोच्या बांधणीपासून ते गाडीचा वेग किती असावा या प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईने पाहणी केली जाते. वेगाबाबतही सुरक्षा विभाग प्रत्यक्ष पाहणी करून लेखी प्रमाणपत्र देत असतो. त्यानुसारच वेग ठेवावा लागतो. प्रवासी वाहतूक सुरू करण्याआधी दररोज एक गाडी संपुर्ण मार्गावर विनाप्रवासी फिरवली जाते. ती जाऊन परत आल्यानंतरच तशी नोंद करून नंतरच प्रवासी वाहतूक सुरू केली जाते. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Observation of Metro works for passenger safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.