Now the time has come for NCP to keep the word | ... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची
... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

ठळक मुद्देबारामती लोकसभा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर पोस्ट

बारामती : ‘आम्ही दिलेला शब्द पाळला, आघाडी धर्म पाळला’ अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकत बारामती लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचित केले...  
बारामती लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदराव सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांचा १ लाख ५४ हजार मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही लक्ष घातले होते. बारामती मतदार संघाचे समन्वयक असलेले भाजपचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘दादा, बिटीया गिरणी चाहिए’ असा संदेश आपल्याला खुद्द पंतप्रधान मोदी यांनी दिला होता, असे सांगितले. त्यामुळे या मतदार संघातील लढत भाजपसाठी देखील प्रतिष्ठेची झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारामती लोकसभा मतदार संघात सभा घेत राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिले होते. परिणामी बारामती लोकसभा मतदार संघातील इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा या तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आघाडीधर्मासाठी तयार करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर होते. इंदापूरमध्ये माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा मागील विधानसभेला राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला होता. तर पुरंदरमध्ये संजय जगताप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील वाद सर्वश्रुत आहे. तसेच भोर-वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधात देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांबरोबर संघर्ष आहे. यापार्श्वभूमीवर भाजपने देखील राष्ट्रवादीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या या तिन्ही नेत्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी पडद्याआडून मोठे प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या देखील उडवण्यात आल्या. मात्र लोकसभेचे निकाल हाती आल्यावर या तीनही तालुक्यामध्ये सुप्रिया सुळे यांना चांगले मतदान झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे. 
----------------------------


 


Web Title: Now the time has come for NCP to keep the word
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.