माळेगाव : माळेगाव येथील संभाजीनगर येथे जिल्हा परिषद सदस्या रोहिणीताई तावरे व त्यांचे पती रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेला सोमवारी (दि. ७) आठवडा पूर्ण झाला आहे. तावरे यांच्यावर पुणे शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, यादरम्यान गोळीबाराच्या घटनेची आजही चर्चा सुरूच आहे. आता जखमी झालेल्या तावरे यांना तत्परतेने दवाखान्यात दाखल करणाऱ्या त्यांच्या ‘दादा’ मित्राची चर्चा रंगली आहे, त्याचे कौतुक होत आहे. वेळेत मिळालेले उपचार ही तावरे यांची जमेची बाजू ठरली आहे.
तावरे पत्नीसमवेत वडापाव नेण्यासाठी आले असताना त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या वेळी गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील अनेक जण गोळा झाले. परंतु कोणीही तत्परतेने मदत न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. अशा वेळी दादा जराड, आदेश डोंबाळे, मयूर भापकर, सौरभ गायकवाड, युवराज जेधे, सुमित घोरपडे यांनी रविराज यांना बारामती येथे दवाखान्यात दाखल केले.
२०१५ साली माळेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक असो की पुणे जिल्हा परिषदेची २०१७ साली झालेली निवडणूक असो प्रत्येक निवडणूक असो की रविराज यांच्या प्रत्येक सुखात दु:खात सावलीप्रमाणे दादा जराड असत. शोले चित्रपटातील जय-विरूची जोडी अशी ओळख या दोघांची होती. मात्र, त्यांच्या मैत्रीमध्ये मध्ये काही वैचारिक मतभेद झाल्याने ही जोडगोळी साधारण तीन वर्षांपासून वेगळी झाली. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर गावातील अनेक मित्रांनी, गावपुढाऱ्यांनी यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु दुर्दैवाने ते एकत्र येऊ शकले नाहीत. त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. कालांतराने या दोघांमध्ये दरी वाढतच गेली. परंतु रविराज यांच्यावर हल्ला झाल्यानंतर येथे बघ्यांचीच गर्दी होती. पुढे येण्याचे धाडस करण्यास कोणी धजावत नव्हते. याच वेळी दादा जराड व त्याच्या मित्रांनीच सर्वप्रथम रविराज यांना दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे तावरे यांना तत्परतेने वेळेवर उपचार मिळाले. या दोन मित्रांमध्ये अनेक गैरसमज झाल्याने हे वेगळे झाले. या दोघांमधील दुरावा नियतीलाही मान्य नसावा. त्याचमुळे यांना एकत्र येण्यास रविराज यांच्यावरील गोळीबाराने यांना पुन्हा एकदा एकत्र आणले.
दादा जराड यांनी जखमी अवस्थेतील रविराज तावरे यांना पाहिले. त्यानंतर एकमेकांचे तोंडही न पाहण्याची घेतलेली शपथेचा विसर पडला. गोळीबार झाल्यानंतर सर्वप्रथम मित्राच्या मदतीला दादा धावून गेला व मित्राला दवाखान्यात दाखल केले.
...माझे आयुष्य सार्थकी लागले
‘लोकमत’शी बोलताना दादा जराड म्हणाले, ज्या वेळी रविराज (चिकू पाटील) यांच्यावर हल्ला झाला, त्या क्षणी माझ्यातील मित्र जागा झाला. मी आणि माझ्या मित्रपरिवाराने कसलाही वेळ न दवडता सर्वप्रथम दवाखान्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला. जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आज माझ्या मित्राचा पुनर्जन्म झाला आहे. माझे आयुष्य सार्थकी लागल्याने मी परमेश्वराचा आभारी आहे.
——————————————
फोटोओळी : दादा जराड
०७०६२०२१-बारामती-३०
————————————————