मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:19 PM2020-01-06T21:19:22+5:302020-01-06T21:28:54+5:30

पक्षप्रमुखांचा पुण्यावर रोष कायमच?

NO active Shiv Sena in Pune after got Chief Minister post | मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

मुुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही पुण्यातली शिवसेना कोमेजलेलीच..

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती राहिली अपूर्णच पुणे शहरात व जिल्ह्यातही शिवसेनेचा नाही आता कोणीही आमदार

पुणे : राज्यात सत्ताप्राप्ती झाल्यानंतरही पुण्यातील शिवसेनेला त्यातून काहीच संजीवनी मिळालेली नाही. मुख्यमंत्री झालेल्या पक्षप्रमुखांचा पुण्यावरचा रोष कायम आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तावाटपात पुण्याला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या दिसत आहेत. कसलेही पद नाही, कोणी विचारतही नाही व कोणी काही सांगतही नाही अशी पुण्यातील शिवसेनेची अवस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून संघटनेत निष्ठेने काम करणाºया शिवसैनिकांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे.
सन २०१४ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरच पक्षप्रमुखांसह मुंबईतील शिवसेनेच्या सर्व बड्या नेत्यांनी पुण्यातील शिवसेनेकडे दुर्लक्ष केले आहे. ती निवडणूक शिवसेना स्वतंत्रपणे लढली. त्यात पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांवर भाजपाला विजय मिळाला. शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीतही शिवसेनेला काहीच कामगिरी करता आली नाही. फक्त ९ जागा निवडून आल्या, त्या तुलनेत भाजपाने मात्र ९८ जागा मिळवत स्वबळावर पालिकेची सत्ता मिळवली. तेव्हापासूनच पुण्यातील शिवसेना मुंबईतून दुर्लक्षित झाली आहे.
त्याचाच परिणाम म्हणून सन २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत युती असूनही पुणे शहरातील किमान एक तरी जागा शिवसेनेला मिळावी म्हणून पुण्यातून प्रयत्न होत असतानाही मुंबईने तिकडे लक्ष दिले नाही. पुण्यात जागा मागता तर पुण्याने शिवसेनेला काय दिले आहे ते सांगा असा सवालच खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांना केला होता. विधानसभेला जागा मिळाली नाहीच, पण लोकसभेला काही नेत्यांनी भाजपाबरोबर अनावश्यक जवळीक केल्याचा ठपका ठेवून पुण्यातील शहर प्रमुखांची दोन्ही पदे रद्द करण्यात आली. विधानसभा मतदारसंघ निहाय प्रमुख नियुक्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा शहर प्रमुख म्हणून संजय मोरे यांची नियुक्ती झाली, त्यानंतर विधानसभा मतदारसंघ प्रमुख निष्प्रभ झाले. शाखाप्रमुख हे संघटनेतील महत्वाचे पदही दुर्लक्षित झाले आहे. 
हा धरसोडपणा संघटनेला मारक ठरत असल्याचे ज्येष्ठ शिवसैनिकांचे मत आहे. पदाधिकारी नाहीत, आहेत त्या नगरसेवकांना ताकद दिली जात नाही, संघटनेचा म्हणून कार्यक्रमच दिला जात नसल्याने करायचे काय या प्रश्नाने कार्यकर्ते हैराण झाले आहेत. शिवसैनिकांबरोबर संवाद राहिलेला नाही, बैठका, चर्चा असे काहीच होत नाही. शहर प्रमुख पदावरून दूर केल्यामुळे महादेव बाबर व चंद्रकांत मोकाटे हे दोन्ही माजी आमदारही सक्रिय राहिलेले नाहीत. शहर प्रमुख म्हणून नव्याने नियुक्त केलेले संजय मोरे हेही पक्षाला राजकीयदृष्ट्या चर्चेत ठेवण्यात कमी पडत आहेत.
राज्यात सत्ता आल्यानंतर यात काही फरक पडेल, पुण्याकडे लक्ष दिले जाईल अशी शिवसैनिकांची अपेक्षा होती, मात्र तसे काहीही झालेले नाही. डॉ. नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती पुर्ण झालेली नाही. पुणे शहरात व जिल्ह्यातही शिवसेनेचा आता कोणीही आमदार नाही. त्यामुळे राजकीय ताकदीत शिवसेना आधीच दुर्बल झाली आहे. पक्षप्रमुखांबरोबर संपर्क साधणेही पुण्यातील पदाधिकाºयांना अवघड झाले आहे.  

Web Title: NO active Shiv Sena in Pune after got Chief Minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.