मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:20 PM2019-11-05T17:20:47+5:302019-11-05T17:48:11+5:30

गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद. 

New generation should not forget theater: Bharati Gosavi | मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद 

मराठी रंगभूमी दिन :अभिनेत्री भारती गोसावी यांच्याशी विशेष संवाद 

googlenewsNext

पुणे : गेली अनेक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री भारती गोसावी यांना मराठी रंगभूमीदिनानिमित्त जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्यांच्याशी नम्रता फडणीस यांनी साधलेला विशेष संवाद. 

आपल्याला जाहीर झालेल्या जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्काराविषयी काय वाटते ?
पुरस्काराबद्दल अत्यंत आनंदी आहे. जवळपास ६० ते ६५ वर्षे रंगभूमीवर काम करीत आहे. त्याची दखल घेतली गेली, याबाबत निश्चितचं समाधानी आहे. आयुष्यभर केवळ नाटक एके नाटकच केलं. संपूर्ण आयुष्य रंगभूमीसाठी समर्पित केलं. त्याचं कुठं तरी चीज झालं असल्यासारखं वाटत आहे.


रंगभूमीचा प्रवास कसा सुरू झाला?
सुरुवातीच्या काळात भानुविलासला पृथ्वी थिएटर आणि बालगंधर्व यांची नाटकं व्हायची. ती आई आणि वडिलांबरोबर पाहायला जायचे. वडिलांच्या पुढाकारानं नाटकात प्रवेश झाला. १९५८मध्ये पहिल्यांदा  ‘संगीत सौभद्र’च्या माध्यमातून रंगभूमीवर पाऊल टाकलं. छोटा गंधर्व, हिराबाई बडोदेकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर राज्य नाट्य, कामगार कल्याण व विविध एकांकिकांमध्ये भाग घेतला.


या प्रवासात कामगार मंडळींची कशा प्रकारे साथ लाभली? तो अनुभव कसा होता?
माझ्या प्रवासात कामगार मंडळींचे खूप मोलाचे सहकार्य मिळाले. मी जिल्हाधिकारी कार्यालय, मामलेदार, आयकर विभाग, पोलीस खाते, एसआरपी अशा ठिकाणी जाऊन त्यांची नाटकं बसवायचे नि त्यात कामही करायचे. सुरुवातीच्या काळात माझ्यासाठी हेच व्यासपीठ होते. एसआरपीएफमध्ये चार वर्षे जाऊन नाटकं बसवली. एसआरपीएफची गाडी रोज मला घरी तालमीसाठी न्यायला यायची.  मला दोन आॅफिसर गाडी जवळच लावून घ्यायला यायचे. तेव्हा वाड्यातले सगळे लोक आश्चर्याने पाहायचे. गाडीपाशी गर्दी जमायची. हिनं काय केलंय, की पोलीस तिला घेऊन जातात? असं लोकांना वाटायचं. मी फक्त गाडीत बसून मजा बघायचे. नाशिकला सैनिकी प्रशिक्षण केंद्रात प्रयोग केला होता. त्या प्रयोगानंतर सर्वांनी मला ‘सॅल्यूट’ केला.
एका कलाकाराला त्यांनी दिलेला सन्मान मी आजही विसरू शकलेले नाही.


आज कलाकारांना खरंच सन्मान मिळतो, असं वाटतं का?
आजच्या काळात कलाकारांना पूर्वीसारखा सन्मान मिळत नाही, हे खरं आहे. नवीन पिढी ज्येष्ठ कलाकारांना म्हणावा तसा आदर देत नाही. या ज्येष्ठांनी काय केली असतील कामं; पण आम्ही आता करतोय तेच बरोबर आहे. याचं थोडं वाईट वाटतं.
रंगभूमीकडून अनेक कलाकार मालिका नि चित्रपटाकडे वळतात. तुम्हाला हे आकर्षण वाटलं नाही का?
नाटकात इतकी व्यस्त होते, की चित्रपटामध्ये जायला वेळच मिळाला नाही. भालजी पेंढारकर, राजा ठाकूर यांच्याकडून चित्रपटासाठी आॅफर आल्या होत्या; पण जावसं वाटल नाही.

Web Title: New generation should not forget theater: Bharati Gosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.