नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 05:55 PM2020-09-17T17:55:48+5:302020-09-17T17:57:19+5:30

एक नाही दोन नाही तर तब्बल आठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल..

Nashik's vehicle thief 'Bullet Raja' was arrested by Pimpri-Chinchwad police | नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

नाशिकचा कुख्यात वाहनचोर ‘बुलेटराजा’ पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देगुन्हे शाखा युनिट एकची कारवाई : १७ लाख ७० हजारांच्या १४ दुचाकी जप्त

पिंपरी : उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरटे सुसाट आहेत. यातील नाशिक येथील कुख्यात वाहनचोर असलेल्या ‘बुलेटराजा’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. तसेच त्याच्या धुळे येथील एका साथीदारालाही अटक केली. त्यांच्याकडून १७ लाख ७० हजारांच्या १४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

हेमंत राजेंद्र भदाने (वय २४, रा. भोरवाडा, सातपूर, नाशिक) तसेच त्याचा साथीदार योगेश सुनील भामरे (वय २४, रा. गरताड, ता. जि. धुळे), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 
केटीएम दुचाकी चोरी केलेला चोर भोसरी येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार युनिट एकच्या पोलिसांची दोन पथके तयार करून सपाळा लावून आरोपी भदाने याला ताब्यात घेतले. त्याने १ सप्टेंबर रोजी धावडेवस्ती, भोसरी येथून केटीएम दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. पिंपरी - चिंचवड व पुणे परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद या भागात विक्री केल्या तसेच लपवून ठेवल्या असल्याचे उघड झाले. यातील १० बुलेट, दोन एफझेड, एक केटीएम व एक पल्सर अशा १४ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी, एमआयडीसी भोसरी, पुणे येथील भारती विद्यापीठ, सहकारनगर, चतु:श्रृंगी, हडपसर, तर नाशिक येथील सरकारवाडा, अंबड या पोलीस ठाण्यांमधील वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. 
पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, अमित गायकवाड, नितीन खेसे, गणेश सावंत, विजय मोरे, प्रमोद गर्जे, मारूती जायभाये, विशाल भोईर, राजेंद्र शेटे, नागेश माळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

फेसबुक व मेसेंजरवरून ग्राहकांशी संपर्क
आरोपी भदाने हा वाहनचोरी करणारा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे नाशिक जिल्ह्यात ३५ व ठाणे शहर येथे दोन असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. लॉकडाऊनच्या काळात आरोपी नाशिक येथून पुण्यामध्ये येऊन महागडी दुचाकी चोरी करून ती बीड, धुळे, नाशिक या भागामध्ये घेऊन जाऊन विक्री करायचा. कागदपत्र नंतर देतो, फायनान्सची गाडी आहे, असे कारण तो ग्राहकाला सांगत असे. त्याचा साथीदार योगेश भामरे याच्या मदतीने देखील दुचाकीची विक्री करीत असे. तसेच फेसबुक व मेसेंजरच्या माध्यमातून आरोपी भदाने ग्राहकांशी संपर्क साधायचा. गाडी विक्री झाल्यावर चॅटिंग तसेच मेसेज डिलीट करीत असे.

दोन लाखाची दुचाकी १२ हजारांत
आरोपी भदाने याला बुलेटसारख्या महागड्या दुचाकींचे आकर्षण असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच सध्या अशा दुचाकींना मागणी आहे. त्यामुळे आरोपी याने अशा दुचाकींना लक्ष केले. पार्किंग किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा दुचाकी पार्क केलेल्या असल्याचे पाहून आरोपी एका रॉडच्या साह्याने त्यांचे हँडल लॉक तोडून दोन वायरी जोडून दुचाकी घेऊन पसार व्हायचा. तसेच ती दुचाकी विक्री करताना त्याची किंमत ५० ते ६० हजार रुपये सांगून ‘अ‍ॅडव्हान्स’ स्वरुपात १२ ते १५ हजार रुपये घेऊन दुचाकी संबंधित ग्राहकाच्या ताब्यात द्यायचा. त्यानंतर संबंधित ग्राहकाशी कोणताही संपर्क करीत नसे. यातील काही दुचाकी किंमत सरासरी दोन लाखांपर्यंत आहे. 

खरेदीदारांची होणार चौकशी
आरोपी भदाने याच्याकडून काही दुचाकी खरेदी करून तसेच काही दुचाकी विक्री करण्यात आरोपी योगेश भामरे याने मदत केली. आणखी काही जणांचा यात समावेश आहे का, याचा शोध सुरू आहे. तसेच अशा दुचाकी खरेदी केलेल्या ग्राहकांकडे देखील विचारणा होणार आहे. इतक्या कमी किमतीत नवी दुचाकी मिळत असतानाही कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित का केली नाही, तसेच दुचाकी चोरीची आहे, असे माहीत असतानाही ती खरेदी केली का, आदी चौकशी अशा ग्राहकांकडून केली जाणार आहे.

Web Title: Nashik's vehicle thief 'Bullet Raja' was arrested by Pimpri-Chinchwad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.