दारुला पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशीच केला आईचा खून; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 02:26 PM2021-10-17T14:26:25+5:302021-10-17T14:29:19+5:30

दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे

Murder of mother on the day of dussehra for not paying for alcohol incidents that disgrace humanity in Pune | दारुला पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशीच केला आईचा खून; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

दारुला पैसे न दिल्याने दसऱ्याच्या दिवशीच केला आईचा खून; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Next
ठळक मुद्देनर्हे येथील घटनेतील मुलाला पोलिसांनी केले अटक

धायरी : दारु पिण्याच्या व्यसनापायी मुलाने दसऱ्याच्या दिवशी आईला हातातील कड्याने, सुरी, लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून केला. सिंहगड रोड पोलिसांनी आईचा खून करणाऱ्या मुलाला अटक केली आहे. सचिन दत्तोपंत कुलथे (वय ३१, रा. महालक्ष्मी आंगन, अभिनव कॉलेज रोड, नर्हे) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. तर, विमल दत्तोपंत कुलथे (वय ६०) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. याप्रकरणी अनिता मोहन चिंतामणी (वय ४४, रा. नर्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि त्याची आई विमल कुलथे हे दोघे जण राहत होते. सचिन याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याच्या या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला एक वर्षापूर्वी सोडून माहेरी निघून गेली आहे. चालक म्हणून काम करणारा सचिन गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता.

मौजमजा करण्यासाठी तो आईकडे नेहमी पैशाची मागणी करत असे. दारुसाठी पैसे न दिल्याने शुक्रवारी दसर्याच्या दिवशी त्याने आईला सुरीने व लाकडाच्या दांडक्याने मारहाण केल्याने यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने फिर्यादी बहिणीला याची माहिती दिल्याने ही घटना समोर आली. घटनेनंतर तो फरार झाला होता. आईवर अंत्यसंस्कार केल्यानंतर अनिता चिंतामणी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या टेकडी परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे करीत आहेत.

सहा मुलीनंतर झाला वंशाचा दिवा...

सुशिक्षित असतात त्याच कुटुंबात वंशाला दिवा पाहिजे असतो, त्यांना मुलगी म्हणजे दुसऱ्याच धन वाटतं. वंशाला दिवा हवा म्हणून कुलथे कुटुंबीय आग्रही होते. सहा मुली झाल्यानंतर त्यांना मुलगा झाला. एकुलता एक मुलगा म्हणून त्याचे सर्वांनीच लाड केले. विमल कुलथे यांच्या पतीचे २०१५ ला निधन झाले. सचिनला दारूचे व्यसन असल्याने त्याला दारुसाठी पैसे हवे होते. मात्र आईने पैशाला नकार देताच वंशाचा दिवा म्हणून आयुष्यभर लाडात वाढवलेल्या मुलाने पैशासाठी जन्मदात्या आईलाच ठार मारले.

घटस्थापनेच्या दिवशी अनिता चिंतामणी या आपल्या आईला भेटायला माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आपल्या आईच्या अंगावर वळ दिसले. तेव्हा त्यांनी चौकशी केल्यावर सचिनने मारहाण केल्याचे त्यांनी सांगितले होते. कोणालाही तो घरी येऊ देत नसे. फिर्यादी यांनी आपण पोलिसांकडे तक्रार करु असे सांगितल्यावर मुलगा आणखी मारेन, म्हणून त्यांनी तक्रार करायला नकार दिला व तू सारखी येत जाऊ नको, असे त्यांना सांगितले होते.

Web Title: Murder of mother on the day of dussehra for not paying for alcohol incidents that disgrace humanity in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.