द्रुतगती मार्गावर अत्याधुनिक यंत्रणांचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:01 AM2019-11-11T05:01:30+5:302019-11-11T05:01:36+5:30

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कवच मिळणार आहे.

mumbai-pune express watch | द्रुतगती मार्गावर अत्याधुनिक यंत्रणांचे कवच

द्रुतगती मार्गावर अत्याधुनिक यंत्रणांचे कवच

googlenewsNext

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कवच मिळणार आहे. महामार्ग वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेच्या (एचटीएमएस) माध्यमातून मार्गावरील प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जाणार आहे. बेशिस्त वाहनांवर नियंत्रणासह अपघात रोखणे, वाहनचालकांना मार्गावरील प्रत्येक महत्वाच्या घटनांबाबत अवगत करणे आदी बाबींसाठी उच्च क्षमतेची यंत्रणा उभारली जाणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी व आयटी हब असलेल्या पुणे शहराला जोडणारा हा ९४ किलोमीटर लांबीचा मार्ग वाहनचालकांसाठी पर्वणी आहे.

देशातील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा मार्ग आहे. दररोज सुमारे ६० हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होत असते. त्यामुळे वाहतुक कोंडी, अपघाताच्या घटना घडत आहेत. पहिल्या दहा वर्षात सुमारे १८०० अपघातांमध्ये ४०० जणांना प्राण गमवावे लागले. अतिवेग, क्षमतेपेक्षा जास्त सामानाची वाहतूक, अनधिकृत थांबे, लेन कटिंग ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. यापार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर नियंत्रण मिळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे.
वेग नियंत्रण यंत्रणा, लेन शिस्तभंग नियंत्रण यंत्रणा, ओव्हरलोड वाहनांवर नियंत्रण, हवामान निरीक्षण यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग यंत्रणा, उच्च क्षमतेचे कॅमेरे, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, अ‍ॅप अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जाणार आहे.
अनधिकृत थांबे, घटनांची माहिती व व्यवस्थापन, वाहनांचा शोध, सीटबेल्ट नियमभंग, मार्गात अडथळे या बाबींवर विशेष लक्ष राहील. एक्सप्रेसवेची सुरूवात व शेवट, फुड प्लाझा, टोल प्लाझा या ठिकाणांसह मार्गाच्या दोन्ही बाजूने ठिकठिकाणी वाहनांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष असेल. वाहनचालकांच्या माहितीसाठी संपूर्ण मार्गावर विविध डिजिटल फलक, माहिती फलक लावण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी वाहनचालकांच्या माहितीसाठी मशीन (किआॅक्स) ठेवण्यात येणार आहेत. पुढील काही महिन्यांत या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.
>अशी असेल प्रस्तावित यंत्रणा
उच्च क्षमतेचे कॅमेरे - ४३
वेग नियंत्रण यंत्रणा - २७
लेन शिस्तभंग यंत्रणा - २८
डोम कॅमेरा - ७
ओव्हरलोड नियंत्रण सेन्सर - ६
आधुनिक संदेश यंत्रणा - २३
हवामान देखरेख यंत्रणा - ११

Web Title: mumbai-pune express watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.