खतरनाक! पुणे- बारामती महामार्गावर ट्रक चोर अन् पोलिसांमध्ये काळजाचा ठोका चुकविणारा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:45 PM2021-05-18T17:45:27+5:302021-05-18T18:35:04+5:30

पोलिसांनी वापरलेल्या अनेक युक्त्या नाYकाम करत आरोपीने बेफामपणे ट्रक चालवत खाकी वर्दीलाच आव्हान दिले होते...

Movie stunts took place in Baramati city! Police finally succeeded in apprehending the accused along with the stolen truck | खतरनाक! पुणे- बारामती महामार्गावर ट्रक चोर अन् पोलिसांमध्ये काळजाचा ठोका चुकविणारा थरार

खतरनाक! पुणे- बारामती महामार्गावर ट्रक चोर अन् पोलिसांमध्ये काळजाचा ठोका चुकविणारा थरार

Next
ठळक मुद्देसासवड आणि पुणे या ठिकाणी गेल्यावर अनेकांचा अपघाती बळी जाण्याची भीती होती, पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला

जेजुरी: एखाद्या हिंदी किंवा साऊथच्या चित्रपटाला शोभेल असा थरार सोमवारी रात्री बारामती-पुणे मार्गावर सासवडपर्यंत अनुभवायला मिळाला. बारामती शहरातून चोरी केलेला ट्रकचोर आणि पोलिसांत हा काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला. आरोपीने थेट पोलिसांना आव्हान देत जीव धोक्यात घालून ट्रक चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र जिगरबाज पोलिसांनी चित्तथरारक पाठलाग करत  त्याचा ट्र्क चोरीचा प्रयत्न हाणून पाडला.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बाबा नाजरकर असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी सध्या बारामती तांंदूळवाडी भागात वास्तव्यास आहे. त्याने अमोल गुरव यांच्या मालकीचा ट्रक चोरून नेला होता. मात्र थरारक पाठलागानंतर पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे, नंदू जाधव यांनी आरोपीला पकडले. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती येथून चोरीला गेलेल्या ट्रकची ‘जीपीएस’द्वारे माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी मोरगाव मार्गावर ट्रकला अडवण्यासाठी काही वाहने रस्त्यावर आडवी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही पोलिस मित्रांसह ट्रकचा पाठलाग सुरू केला. ट्रक ‘झिगझॅग’ पद्धतीने वेगाने चालवत आरोपीने रस्त्यावर आडवी लावलेले पिकअप वाहन ट्रकने उडवले. आरोपीने अतिशय थरारक पध्दतीने ट्रक कुणालाही ‘ओव्हरटेक’ न होण्याची दक्षता घेत आरोपीने ट्रक जेजुरी, सासवडच्या दिशेने नेला. अडवण्याचा प्रयत्न केल्यास सरळ अंगावर ट्रक घालण्याचा त्याने सपाटाच सुरू ठेवला. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले.याच दरम्यान या घटनेची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याला मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनची हद्दीत पोलीस शिपाई शेंडे पोलीस मित्र संजय खोमणे यांनी पाठलाग सुरू केला. मात्र, आरोपीने कोणालाही जुमानले नाही. अतिशय बेफिकीर पद्धतीने आरोपीने ट्रक अनियंत्रितपणे चालवणे सुरूच ठेवले. 

बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्वत: पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याशी बोलून घटनेची माहिती दिली. निरीक्षक महाडिक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: मोरगाव चौकात थांबून नाकाबंदी केली. यावेळी ट्रक अडवण्यासाठी पोलिसांनी मोरगावचा अनुभव पाहता येथे मोठी दक्षता घेतली. पोलिसांनी चक्क दोन अवजड वाहने रस्त्यावर लावून ट्रकची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेफाम निघालेला ट्रक मोरगाव चौकात आला. उजवीकडे जाऊन सरळ तो ट्रक आडव्या लावलेल्या ट्रकवर घातला. तसेच रस्त्यालगतचे सलून व हॉटेलचा भाग उडवला. यावेळी जोरदार धडक दिल्याने ट्रक पलटी होता होता बचावला. परत त्यानंतर त्याच वेगाने सासवड रस्त्यावर आला. आरोपीच्या या पोलिसांना देखील न जुमानणाऱ्या वृत्तीने आता पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, त्याची तमा न बाळगता त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला.

 

पोलिसांना आरोपीचे मानसिक नियंत्रण सुटल्याचा, तसेच तो नशेत असल्याचा संशय आला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून पोलीस निरीक्षक महाडिक, चालक ४ ते ५ होमगार्ड यांनी पाठलाग सुरू केला. सासवडलासुद्धा नाकाबंदी लावण्यात आली. ट्रक कुणालाही पुढे जाऊ देत नसतानाच दुहेरी रस्ता सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी १२० च्या वेगात त्या ट्रकला लांबून ओव्हरटेक केले. सासवडच्या अलीकडे एकेरी रस्ता, अरुंद पूल असणाऱ्या ठिकाणी परत वजनदार ट्रक रस्त्याला आडवे लावण्यात आले. संबंधित आरोपीने ट्रक रस्त्यावर आडवे लावल्याचे पाहिले. यावेळी मात्र पोलिसांना यश आले. आरोपीने ट्रक सोडून देत क्लिनर साईड ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पाठीमागे असणाऱ्या लोकांनी व बारामती तालुका पोलिसांनी त्याला पकडत सासवड पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अनेकांचा अपघाती बळी जाण्याची भीती होती... 
चोरीला गेलेला ट्रक पकडताना पोलिसांनी रस्त्यावरील इतरांचा अपघात होणार नाही, याची दक्षता घेतली.पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती देण्यात आली. हे थरारनाट्य रात्री १० वाजल्यापासून १२ वाजून १० मिनिटांपर्यंत सुरू होते.

Web Title: Movie stunts took place in Baramati city! Police finally succeeded in apprehending the accused along with the stolen truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.