आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक उपेक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 02:07 PM2020-11-30T14:07:54+5:302020-11-30T14:22:49+5:30

पुणे शहरातील संगम पुलाजवळच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात हे स्मारक असून सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते.

The monument of early revolutionary Vasudev Balwant Phadke has been neglected | आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक उपेक्षितच

आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचे स्मारक उपेक्षितच

googlenewsNext
ठळक मुद्देघाणीचे साम्राज्य : स्मारकामागेच मेट्रो कामगारांसाठी स्वच्छतागृह

लक्ष्मण मोरे - 

पुणे : इंग्रजांविरुद्ध धनगर, कोळी, रामोशी आदी उपेक्षित समाजातील तरुणांना संघठीत करुन स्वातंत्र्याचा सशस्त्र लढा उभारणाºया आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. उपेक्षेच्या गर्तेत सापडलेल्या या स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून मेट्रोच्या कामगारांसाठी या स्मारकाला लागूनच स्वच्छतागृह  तयार करण्यात आली आहेत. देशासाठी तारुण्याची होळी केलेल्या फडकेंच्या स्मारकाच्या नशीबीही काळकोठडीच आल्याचे चित्र याठिकाणी दिसते आहे.

संगम पुलाजवळील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या जुन्या कार्यालयाच्या आवारात हे स्मारक असून सध्या धूळमातीच्या आणि झाडाझुडपांच्या विळख्यात अडकले आहे. या ठिकाणी ब्रिटिश काळामध्ये सत्र न्यायालय होते. फडकेंनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे निशान फडकावल्यानंतर इंग्रजांनी त्यांना विजापूरनजीक अटक करून १८७९ साली पुण्यात आणले होते. त्यांच्यावर याच सत्र न्यायालयामध्ये खटला चालविण्यात आला. खटला सुरू असताना सार्वजनिक काका फडकेंचे वकीलपत्र घेण्यासाठी धैर्याने पुढे आले. महादेव चिमाजी आपटेंनी न्यायालयात फडकेंची बाजू बेडरपणे मांडली. त्यांचे सहायक वकील म्हणून चिंतामण पांडुरंग लाटे यांनी न्यायालयात फडकेंचा बचाव केला. खटला सुरु असताना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर इंग्रजांनी फडकेंच्या बंडात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला होता.  

खटला सुरु असताना फडकेंना तेथीलच एका खोलीमध्ये डांबण्यात आलेले होते. १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० या कालावधीमध्ये फडके या कोठडीमध्ये होते. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची रवानगी एडनच्या कारागृहात झाली. या संपूर्ण लढ्याची साक्षीदार असलेल्या या वास्तूमधील स्मारक मात्र एकाकी उपेक्षा सहन करते आहे.
====


याच वास्तूच्या आवारात फडकेंचे स्मारक असावे यासाठी सीआयडीचे तत्कालीन महासंचालक जयंत उमराणीकर यांनी लोकवर्गणी आणि फडके स्नेहवर्धिनी संस्थेच्या अर्थसाहाय्यामधून २१ फेब्रुवारी २००६ रोजी एक देखणं स्मारक उभं केलं. येथे काम करणाºया पोलिसांना प्रेरणा मिळावी, ही वास्तू एका क्रांतिकारकाच्या स्पर्शाने पावन झालेली आहे याची जाणीव कायम राहावी, याकरिता या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती.
=====


काय आहे या स्मारकामध्ये?
1
. वासुदेव बळवंत फडकेंच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींचे चित्रण असलेले म्युरल्स
2. फडकेंच्या आयुष्याचे शिल्परुपी चित्रण केले आहे प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या कसबी हातांनी
3. स्मारकाच्या घुमटावर पराग घळसासी आणि रामचंद्र खरटमलांनी त्याचे रेखाटन केलेला फडकेंचा अर्धाकृती पुतळा.
4. फडकेंना कैद्येत ठेवण्यात आलेली कोठडी, या कोठडीच्या समोर कचरा टाकला जात असून दररोज तो जाळलाही जातो. यामुळे या परिसराला अवकळा आली आहे.
===
स्मारकाभोवतीचे स्मृती उद्यान झाले गायब
 
स्मारकाभोवती  स्मृती उद्यान उभारण्यात आले होते. हे स्मृती उद्यान नामषेश झाले असून याठिकाणी रानटी गवत वाढले आहे. मेट्रोच्या कामात लागणारे बांधकाम साहित्य याठिकाणी पडलेले असून धुळमातीमुळे स्मारक झाकोळून गेले आहे.
====
जुन्या सीआयडी कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखा, लोहमार्ग पोलीस आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाची कार्यालये आहेत. याठिकाणी पोलिसांचा दिवसरात्र राबता असतो. पोलिसांना फडकेंच्या स्मारकातून प्रेरणा मिळावी याकरिता हे स्मारक उभारण्यात आले होते. परंतु, पोलिसांचेही याकडे दुर्लक्षच झालेले आहे. 

Web Title: The monument of early revolutionary Vasudev Balwant Phadke has been neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.