दुर्गा भागवतांसाठी मोहन धारियांनी दिला होता राजीनामा
By राजू इनामदार | Updated: December 9, 2025 10:10 IST2025-12-09T10:08:48+5:302025-12-09T10:10:30+5:30
- अ. भा. साहित्य महामंडळाचा इतिहास : उलगडणार पडद्याआडच्या अनेक गोष्टी

दुर्गा भागवतांसाठी मोहन धारियांनी दिला होता राजीनामा
पुणे : मोहन धारिया पुण्यातील अ. भा. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत असे समजल्यावर तत्कालीन मावळत्या संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी संमेलनस्थळी नव्या अध्यक्षांकडे सूत्रे सोपवण्यासाठी येणारच नाही अशी जाहीर भूमिका घेतली. तेव्हाचे केंद्रीय वाणिज्य मंत्री मोहन धारिया यांना ही बाब समजताच त्यांनी दिल्लीतूनच आपल्या स्वागताध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, असा त्यांचा ऋजू स्वभाव होता.
अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या इतिहासातून मराठी साहित्य संमेलनाच्या पडद्याआड घडलेल्या अनेक गोष्टी ग्रंथरूपात उलगडणार आहेत. महामंडळात कार्यकर्ता ते पदाधिकारी असलेले प्रा. कौतिकराव ठाले पाटील हे ग्रंथ लिहित आहेत. २०२७ मध्ये होणाऱ्या शंभराव्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ठाले पाटील यांच्यावर ग्रंथलेखनाची जबाबदारी सोपवली आहे. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी मोहन धारिया यांच्या राजीनाम्याची गोष्ट सांगितली.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी विदर्भ, मराठवाडा, कोकण, पुणे येथे प्रदेश प्रातिनिधित्व करणाऱ्या मराठी साहित्य शाखांचे काम सुरू होते. प्रत्येकाचे नियम, मराठी भाषेचे व्याकरण, लिखित भाषेची भूमिका वेगळी होता. पुण्याची भाषा विदर्भाला मान्य नव्हती तर विदर्भावर असलेला हिंदी भाषेचा पगडा मराठवाड्याला मान्य नव्हता. पुणेकरांचा आमचीच भाषा म्हणजे प्रमाण भाषा हे तर अनेकांना मान्य नव्हते. त्यावरून व्याकरणाचे, मांडणीचे, लिहिण्याच्या पद्धतीचे वाद होऊ लागले.
तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर साहित्य विषयक काम करणाऱ्या सर्व शाखांचे एकत्रीकरण व्हावे असे वाटले. त्यांनी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांना तशी विनंती केली. पोतदार यांनी परिश्रमपूर्वक काही नियम तयार केले. त्यातूनच १९६१ मध्ये अ. भा. साहित्य महामंडळाची स्थापना झाली. तोपर्यंत होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनांची जबाबदारी स्वीकारणे व मराठी भाषेसंबधी काम करणे ही दोन महत्त्वाची कामे महामंडळाने ठरवून घेतली. महामंडळाचे मुख्य कार्यालय फिरते राहील वगैरे गोष्टीही ठरल्या. त्याप्रमाणे आजही काम सुरू आहे. याचा अभ्यासपूर्ण वेध या नियोजित ग्रंथात समाविष्ट असेल. एक संदर्भग्रंथ असे तर त्याचे स्वरूप असेल शिवाय ते रंजक व वाचनीय करण्याचाही प्रयत्न आहे, असे प्रा. ठाले म्हणाले.
वादविषय झालेल्या अनेक संमेलनांमुळे बरेच काही घडले आहे, त्यावेळीही बरेच काही घडतच होते. पहिल्या संमेलनातील न्यायमूर्ती रानडे व महात्मा फुले यांच्यातील पत्रव्यवहारापासून ते आतापर्यंतच्या सर्व गोष्टी यात असतील. यातून बरेच काही चांगलेही झाले आहे. काही भाग लिहूनही झाले आहेत. अनेकांबरोबर बोलून, प्रत्यक्ष भेट घेऊन, मुलाखती घेत व उपलब्ध कागदपत्रे वाचून, अभ्यासून या ग्रंथलेखनाचे काम सुरू आहे. - प्रा. कौतिकराव ठाले पाटील