पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 07:40 PM2020-08-12T19:40:20+5:302020-08-12T19:41:18+5:30

गणेश मुर्ती विक्रेत्यांना पालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या मोफत उपलब्ध करून देण्यात येणार

Mayor orders action against unauthorized Ganesh idol sale stall in Pune city | पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील सर्व अनधिकृत गणेशमूर्ती विक्री स्टॉलवर होणार कारवाई : महापौरांचे प्रशासनाला आदेश

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या मोकळ्या मैदानातील भाडे व डिपॉझिटही केले कमी 

पुणे : पदपथांंवर अथवा रस्त्यांच्या कडेला गणेश मुर्ती विक्री करिता उभारण्यात आलेल्या सर्व अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रशासनास बुधवारी दिले आहेत. दरम्यान, या सर्व गणेशमुर्ती विक्रेत्या स्टॉलधारकांना परिसरातील महापालिकेच्या शाळांमधील वर्गखोल्या गणेश मुर्ती विक्रीसाठी मोफत उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचित केले आहे. 
    शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले असून, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी आगामी गणेशोत्सवात गणेश मुर्ती खरेदी करण्याकरिता नागरिकांनी गर्दी करू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे़ या उद्देशाने रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील तसेच उपनगरातील सर्व पदपथ (फुटपाथ) व रस्त्याच्या कडेला असलेल्या गणेश मुर्ती विक्रेत्या स्टॉलवर कारवाई करावी असे आदेश महापौरांनी दिले आहे. 
    दरम्यान, या सर्व स्टॉलधारकांना महापालिकेतील वर्ग खोल्या एका आड एक मोफत उपलब्ध करून दिल्या जातील. याकरिता कोणतेही भाडे आकारण्यात येणार नाही. मात्र, जोपर्यंत स्टॉल असेल तोपर्यंत अनामत रक्कम म्हणून पाच हजार रूपये घेण्यात येणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. दुसरीकडे प्रत्येक गणेश मुर्ती विक्रेत्यास प्रत्येक गणेश मुर्तीसह एक किलो अमोनियम बायोकार्बोरेट देण्याचे आदेश देण्यात आले असून, या रसायनाचा पुरवठा महापालिकेकडून क्षेत्रिय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून दिला जाणार आहे.याचबरोबर नागरिकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे याकरिता, पालिकेच्या आरोग्य कोठींसह मोठ्या सोसायट्यांमध्ये ही पालिकेच्यावतीने अमोनियम बायोकार्बोरेट हे रसायन पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
    ---------------
महापालिकेच्या मोकळ्या मैदानातील भाडे व डिपॉझिटही केले कमी 
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने रस्त्याच्या कडेला गणेशमुर्ती विक्री स्टॉलला परवानगी न देता, महापालिकेची मैदाने व अ‍ॅमेनिटी स्पेस येथे मंडप उभारणी करून गणेशमुर्ती विक्रीस परवानगी दिली होती. परंतु, याकरिता भाडे व डिपॉझिट रक्कम जास्त असल्याने आत्तापर्यंत केवळ दोनच ऑनलाईन अर्ज आले होते. यामुळे आता महापालिकेने हे भाडे व डिपॉझिट कमी केले असून, दिवसाला असलेले ९७५ रूपये भाडे ५०० रूपये व डिपॉझिटची रक्कम दहा हजार रूपयांवरून पाच हजार रूपये केली आहे. 

Web Title: Mayor orders action against unauthorized Ganesh idol sale stall in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.