maternity leave women removed from work in the barti | बार्टीत प्रसूतीरजा घेणाऱ्यांना काढले कामावरून

बार्टीत प्रसूतीरजा घेणाऱ्यांना काढले कामावरून

ठळक मुद्देनिबंधकांचा अजब फतवा : मनुष्यबळ पुरवणाऱ्यां ब्रिस्कला पाठवले पत्र

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहे. समतादूत प्रकल्पावरून सध्या वरिष्ठ पातळीवर हालचाली होत असताना आता बार्टीच्या निबंधकांनी काढलेल्या एका अजब फतव्याची चर्चा सुरू झाली आहे. महिला कर्मचारी प्रसूती रजेवर जातात, त्यामुळे त्या रजेवर गेल्यावर पुन्हा त्यांना कामावर घेऊ नये, त्याऐवजी दुसरे पात्र उमेदवार तत्काळ भरावेत, अशा आशयाचे हे पत्र असून, काही महिला कर्मचाºयांना या पत्रामुळे नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे ज्या निबंधक यादव गायकवाड यांनी असे पत्रक काढले आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता असे पत्रक काढले नसल्याचे त्यांनी म्हटले असून, बार्टीच्या लेटरहेडचा कुणीतरी गैरवापर केल्याची शक्यता वाटते, असे सांगितले.
ब्रिस्क कंपनीला देण्यात आलेल्या या पत्रात म्हटले आहे की, बार्टी संस्थेत आपल्या कंपनीकडून बाह्यस्त्रोत पद्धतीने करार तत्वावर महिला कर्मचारी मनुष्यबळ पुरवण्यात आले आहे. सदर महिला कर्मचारी दीर्घकाळ प्रसूती रजेवर जातात. ज्या महिला कर्मचारी प्रसूती रजेवर गेल्या आहेत अथवा यापुढे जातील, अशा महिला कर्मचाºयांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येऊन त्यांच्या जागी शैक्षणिक अर्हता, चारित्र्य प्रमाणपत्र इत्यादीची पडताळणी करूनच तसेच करारनाम्यातील अटी व शर्थीच्या अधीन राहून नवीन मनुष्यबळाचा रितसर पुरवठा करावा. यापत्रावर ह्यमहासंचालकांच्या मान्यतेनेह्ण असे एक वाक्य असून, याची एक प्रत महासंचालक 
कैलास कणसे यांच्या स्वीय सहायकांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना कायद्यानेच दिलेला अधिकार हिरावून घेण्याचा हा प्रकार असून, बार्टीचे धोरण महिलाविरोधी असल्याचे बोलले जात आहे. प्रसूती रजा नाकारण्याचा निर्णय बाबासाहेबांच्या विचारांच्या विरोधी तर आहेच तसाच तो स्त्री-पुरुष समानतेच्या देखील विरोधी आहे. मानवी जीवनासाठी हे अत्यंत घातक आहे, असे सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी म्हटले आहे.
काही पीडित महिलांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले की, आमच्याबाबतीत असे घडले. आम्हाला नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. मात्र, इतर कोणत्या महिलेला अशा पद्धतीने नोकरी गमवावी लागू नये, एवढीच अपेक्षा आहे. निबंधकांनी ब्रिस्कला पाठवलेले पत्र बार्टीतीलच काही कर्मचारी वाचून दाखवतात. त्याचा दाखला देऊन तुम्हाला परत कामावर घेता येत नाही, असे सांगतात तरीही निबंधक मला हे माहितीच नाही, असे म्हणत असतील, तर बार्टीत नेमकं काय चाललय, असाच प्रश्न उपस्थित होतो, असेही या कर्मचाºयांनी म्हटले आहे. संशोधन विभागासह इतरही विभागातील महिलांबाबत असा प्रकार घडल्याची चर्चा आहे. या सर्व महिला उच्चशिक्षित असून, याआधीही असाच काहिसा प्रकार घडला होता, त्यावेळी एका महिला कर्मचाºयाने न्यायालयातही दाद मागितली होती. त्यावर बार्टीला प्रसूती रजा काळातील वेतन देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, बार्टी पुन्हा न्यायालयात गेल्याचीही माहिती समोर येत आहे. 
------------
कामगार आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला. स्त्रियांच्या इच्छा आणि स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे पत्र आहे. प्रसूती रजा हा मूलभूत अधिकार आहे. तोच नाकारला जात असेल, तर बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाराच हा निर्णय आहे. ज्या महिलांना प्रसूती रजेचे कारण देऊन कामावर घेतलेले नाही, त्यांना तत्काळ कामावर रूजू करून घ्यायला हवे. 
- प्रा. प्रतिमा परदेशी, स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या
---------------
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही बार्टीमध्ये काम करीत होतो. प्रसूतीसाठी सहा महिने रितसर अर्ज देऊन रजा घेतली होती. ही रजा बिनपगारीच धरली जाते. त्याचे पैसे मिळाले नाहीत. पण, रजेवरून परत आल्यावर कामावर रुजू करून घेण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे. निबंधक, महासंचालक यांच्याकडे फेºया मारण्यातच वर्ष निघून गेले. कुटुंब चालवायचे म्हणून आता दुसरा रोजगार बघायला सुरु केले आहे. 
- पीडित महिला कर्मचारी
--------------
प्रसूती रजेसंदर्भात असे काही पत्रक आले असेल, तर त्यात लिहिताना चूक राहिली असण्याची शक्यता वाटते. मात्र, बार्टी म्हणून आम्ही अशा आशयाचे काही पत्रक काढलेले नाही. ते ब्रिस्कबाबत काहीतरी असेल.  
- कैलास कणसे, महासंचालक, बार्टी

Web Title: maternity leave women removed from work in the barti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.