Marvel Realtor CEO’s arrest maybe the tip of the iceberg of a larger scam | पावणेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अटक
पावणेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अटक

ठळक मुद्दे विश्वजित सुभाष झंवर (४९) असे अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. मुकेश मोहनदास मनसुखानी (४०) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मार्वेल बिल्डरचे विश्वजित झंवर यांना शुक्रवारी रात्री हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच अनेक राजकीय नेते, नगरसेवक यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

पुणे - ग्राहकाच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये परस्पर बदल करुन रजिस्टर खरेदीखतामध्ये महापालिकेचा मंजूर नसलेला खोटा प्लॅन लावून दुबईस्थित दोघांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला हडपसर पोलिसांनीअटक केली आहे. विश्वजित सुभाष झंवर (४९) असे अटक केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्याचे साथीदार कार्तिक धनशेखरन (३६), संजय जस्सुभाई देसाई आणि प्रमोद तुकाराम मगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकेश मोहनदास मनसुखानी (४०) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, मगरपट्टा येथे मार्वेल कायरा यांच्या बांधकाम प्रकल्पात मनसुखानी यांनी बी विंगमधील १२ व्या मजल्यावरील १२०१ हा डुप्लेक्स व सर्वात मोठा फ्लॅट व त्याचबरोबर याच मजल्यावर स्काय रेस्टॉरंट व १६ व्या मजल्यावर जीम अशी सुविधा असलेला व एकूण क्षेत्रफळ ६४४़ ७४ मीटरचा बिल्टअप एरिया असलेला व दोन कार पार्किंग असा फ्लॅट मनसुखानी यांनी ५ नोव्हेंबर २०१४ मध्ये ५ लाख रुपये भरुन बुक केला. त्यानंतर ४ एप्रिल २०१५ मध्ये फ्लॅटचे रजिस्टर खरेदीखत केले. त्यानंतर वेळोवेळी एकूण १ कोटी ८२ लाख ४६ हजार १८० रुपये दिले. मनसुखानी यांनी ३० जून २०१७ नंतर वेळोवेळी विश्वजि झंवर यांना फ्लॅटच्या ताब्याविषयी विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़. त्यामुळे मनसुखानी हे भारतात आले व त्यांनी झंवर यांच्या ऑफिसवर जाऊन व मगरपट्टा येथील मार्वेल कायरा स्कीमच्या बांधकाम साईटवर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी फक्त दोन बिल्डिंगचे अर्धवट आरसीसी बांधकाम झाल्याचे पाहिले व खरेदीखताप्रमाणे बांधकाम नसल्याचे दिसले. त्याबाबत त्यांनी झंवर यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी फक्त दोन बिल्डिंगचे काम करणार आहे. तिसऱ्या बिल्डिंगचे काम करणार नसल्याचे सांगितले. 

त्यामुळे मनसुखानी यांनी दिलेले १ कोटी ८२ लाख ४६ हजार १८० रुपये घेऊन त्याचा वापर दुसरीकडे करुन त्यांना वेळेवर फ्लॅटाचा ताबा दिला नाही,  म्हणून मनसुखानी यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी झंवर व त्यांच्या अन्य तीन साथीदारांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

मनसुखानी यांचे भाऊ नवीन मोहनदास मनसुखानी यांनी मार्वेल कायरा स्कीममध्ये १६ व्या मजल्यावर १६०१ हा फ्लॅट बुक केला होता. त्यांनी आतापर्यंत वेळोवेळी १ कोटी ८५ लाख ५८ हजार ९८६ रुपये दिलेले असताना त्यांनाही फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी विश्वजित झंवर यांना अटक केली आहे. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असताना अधिक तपासासाठी न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

पुणे शहरातील इतर काही गुंतवणुकदारांची मार्वेल बिल्डरच्या मगरपट्टा येथील मार्वेल कायरा या स्कीममध्ये फसवणूक झाली असल्यास तक्रार नोंदविण्यासाठी हडपसर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी केले आहे. याप्रकरणात विश्वजित झंवर यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा यात किती सहभाग आहे, याची तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी सांगितले. मार्वेल बिल्डरचे विश्वजित झंवर यांना शुक्रवारी रात्री हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच अनेक राजकीय नेते, नगरसेवक यांनी हडपसर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला.


Web Title: Marvel Realtor CEO’s arrest maybe the tip of the iceberg of a larger scam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.