Maharashtra CM : राजकीय भूकंपाचे सोशल मीडियावर हादरे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 08:01 PM2019-11-23T20:01:15+5:302019-11-23T20:13:14+5:30

‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं सपने देख रहा थे मैं’ अशा पोस्टमधून शिवसेनेच्या जखमेवरही  मीठ चोळण्यात आले....

Maharashtra CM : Political quake shouted on social media ... | Maharashtra CM : राजकीय भूकंपाचे सोशल मीडियावर हादरे...

Maharashtra CM : राजकीय भूकंपाचे सोशल मीडियावर हादरे...

googlenewsNext

पुणे : महाराष्ट्रात गनिमी काव्याने देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय भूकंपाने शनिवारी राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेला चांगलाच हादरा दिला. या घडामोडीचे पडसाद सोशल मीडियावर उमटले नसते तरच नवल! एकीकडे ‘मी पुन्हा येईन’ असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विराजमान होण्यावर समर्थकांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे राष्ट्रवादी बरोबर घरोबा केल्याने  ‘पारदर्शक भ्रष्टाचार’ असे म्हणत नेटिझन्सनी नाराजीचा सूरही आळविला आहे. अनेकांना  ‘ये बात कुछ हजम नहीं हुई’ असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले. 
राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा तिढा सोडविण्याचा केविलपणा प्रयत्न काहीअंशी यशस्वी होण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच सकाळी सकाळीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची बातमी येऊन थडकली आणि अनेकांची झोप उडाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल मीडियावर नेटिझनसच्या पोस्ट झळकू लागल्या. ’शपथविधी होता का? दशक्रियाविधी. एवढ्या सकाळी सकाळी आटोपला’ अशा शब्दात या घटनेची खिल्ली उडविण्यात आली. ‘भंडारा चल रहा था, अंदर गए तो हलवा खतम, बहार आए तो चप्पल गायब’,  ‘चिटिंग करताय तू...बेचारा सो रहा था मैं सपने देख रहा थे मैं’ अशा पोस्टमधून शिवसेनेच्या जखमेवरही  मीठ चोळण्यात आले. 
’ पळून जाऊन राजभवनात दोघांचे लग्न’ अशा आशयाखाली नवरदेव देवेंद्र आणि वधू अजितदादा तर राज्यपाल भटजी अशा कल्पकतेच्या पोस्टमधून अनेकांचे मनोरंजन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांकडे हात दाखवत म्हणत आहेत  ‘हे कधी काय करेल काही सांगता येत नाही’ हे सूचक विधानही खूपकाही सांगून गेले. ’पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात शेती प्रश्नांवर जी एक तास चर्चा झाली, त्याचेचं पीक आज आलेले आहे’ असा टोलाही लगावण्यात नेटिझन्स मागे नव्हते. माध्यमांना मिळालेल्या खात्रीलायक सूत्रांनुसार हा शब्द इतका परवलीचा झाला आहे की नेटिझन्सनी त्याच्यावरही तोंडसुख घेत  ‘अखेर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूत्राला ही माहिती नव्हती’ अशा मेसेजमधून माध्यमांनाही लक्ष्य केले. अजित पवारांच्या बंडखोरीचे समर्थन , सुप्रिया सुळे यांचे ‘पार्टी आणि फँमिलीमध्ये फूट’ असे स्टेटस यांचीही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बुद्धधीबळ खळेत आहेत आणि पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यावर हात ठेवला आहे हे अत्यंत ‘मार्मिक’ व्यंगचित्र ’बोलके’ठरले. 

Web Title: Maharashtra CM : Political quake shouted on social media ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.