महाभारत हे ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही - नितीश भारद्वाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 10:17 PM2018-11-30T22:17:22+5:302018-11-30T22:20:11+5:30

आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे. 

 Mahabharata is not 'mythology' or 'myth' - Nitish Bhardwaj | महाभारत हे ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही - नितीश भारद्वाज

महाभारत हे ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही - नितीश भारद्वाज

Next

पुणे  - आज महाकाव्यांच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जाते. पण महाभारत ’मायथॉलॉजी’  किंवा ’मिथक’ नाही. भारतीय वारसा म्हणून त्याच्याकडे पाहायला हवे.  महाकाव्यांवर संशोधन झाले आहे.’कुतूहल’ असणं ही चांगली गोष्ट आहे. मात्र फक्त हिंदू धर्माला  प्रश्न विचारू नका, ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मात हे असचं आहे का? असे प्रश्न देखील पडूद्यात, असे मत महाभारतातील ‘श्रीकृष्ण’ नितीश भारद्वाज यांनी लगावला.

        ‘महाभारत’चे गारूड आजही प्रेक्षकांवर आहे, कारण  बी.आर चोप्रा यांनी ही मालिका पैशासाठी निर्मित केली नव्हती. मात्र सध्या मालिकांमध्ये पैसा आणि तंत्रज्ञानाचा  मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. आज जे महाभारत पडद्यावर दाखविले जात आहे, त्यामध्ये अर्जुन आणि भीम सिक्स पँकमध्ये दाखविले जात आहेत. मालिकेमध्ये स्पेशल इफेक्टस आहेत पण ‘प्राण’ नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दूरचित्रवाणीवर अजरामर ठरलेल्या  ‘महाभारत’ या मालिकेला नुकतीच तीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त‘परिवर्तन इव्हेंटस’, राष्ट्रीय चित्रपट संग्रहलाय आणि म्युटेश यांच्यातर्फे डॉ. नितीश भारद्वाज यांच्याशी संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  ’महाभारत’चे सामाजिक जीवनातील स्थान, त्याचे कालसुसंगत संदर्भ, श्रीकृष्ण ची वाट्याला आलेली भूमिका अशा अनुभव कथनातून या ‘श्रीकृष्णा’ने महाभारताचे सार विशद केले.

’महाभारत’ जीवनाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे काही घडते ते महाभारतात दिसते. ती जणू जीवनाची एक कथा आहे.  ‘महाभारत’ हे कालसुसंगत आणि प्रासंगिक आहे. महाभारतातील प्रत्येक पात्र  ‘ग्रे’ आहे. अशी पात्र आसपास जीवनातही भेटतात. म्हणून महाभारत हे केवळ अध्यात्मिक दृष्टीकोनातून वाचले जाता कामा नये. बाहेरच्या समाजाशी कसे वर्तन करावे हे महाभारतातून कळते. चूक किंवा  बरोबर काय आहे? मर्यादा काय आहेत हे महाभारत शिकविते.

महाभारतात प्रत्येक व्यक्तीने प्रतिज्ञा घेतली आहे. तिथे शब्दाला जागणं होतं. लिखित शब्दांची आवश्यकता नव्हती. आज न्यायालयात न्यायाधीशांसमोर प्रतिज्ञा घेतली जाते मात्र केसेसची  कागदपत्रे वर्षोनुवर्षे पडून आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. स्वीकारणं म्हणजे परिवर्तन आहे. ऋतुप्रमाणे मनुष्याने बदलायला हवं. मला हवं तस स्वीकारावं ही मानसिकता बदलायला हवी. सध्याच्या समाजव्यवस्थेत  महिला अत्याचार, कपटातून गोष्टी बळकावणे, भ्रष्टाचार हा अधिकार बनला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आज कोणतीही गोष्ट तात्काळ शोधायचे तर ‘गुगल’ हा पर्याय आहे. मात्र ते केवळ  माहिती संकललाचे  माध्यम आहे, पण ते अचूक आहे का त्याची प्रमाणता बघण्यासाठी  पुस्तकांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
 
इथ माझं  ‘मीटू’ होणार नाही
कृष्णाच्या अनेक गोपिका होत्या असे म्हटले जाते. पण ’कृष्ण’ म्हणजे एक समर्पण भाव आहे. घुसमटीत जीवन जगणा-या समाजाला पंधरा वर्षाचा मुलगा बासरीच्या धूनेतून मोहित करतो...इथं माझं नक्कीच  ‘मीटू’ होणार नाही अशी मिस्किल टिप्पणी त्यांनी केली.
 
’कृष्ण’ कसा झालो
’महाभारत’ साठी आॅडिशन द्यायला गेलो होतो. माझ वय केवळ 23-24 वर्षांच होते. रवी चोप्रा यांच्या डोक्यात मी कृष्ण म्हणून मुळीच नव्हतो. माझ्या वाटयाला  ‘विदुर’ आणि मग  ‘नकुल’ अशा भूमिका आल्या. ज्या मी नाकारल्या. गुंफी पटेल यांचा फोन आला की तू  ‘कृष्णाकरिता आॅडिशन द्यायला ये. पण मी गेलो नाही. त्यादरम्यान एक मराठी आणि हिंदी चित्रपट केला. अचानक रवी चोप्रा पुन्हा स्टुडिओत भेटले. तेव्हा कृष्णाची आॅडिशन द्यायला का येत नाहीस? असे विचारले. कृष्ण महानायक आहे. महाभारताचा केंद्रबिंदू आहे
त्यामुळे कृष्णाची भूमिका पेलू शकत नाही असे सांगितले. पण खूप आग्रह केल्यामुळे गेलो आणि माझी भूमिकेसाठी निवड झाली असल्याचा अनुभव नितीश भारद्वाज यांनी सांगितला.

Web Title:  Mahabharata is not 'mythology' or 'myth' - Nitish Bhardwaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.