लोकमत इम्पॅक्ट : आता ‘होम आयसोलेशन’ झालेल्या रूग्णांच्या हातावर शिक्का व घराच्या दारावर स्टिकर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:53 PM2020-09-18T12:53:53+5:302020-09-18T12:54:43+5:30

पुणे महापालिकेने कोरोनाबाधित रूग्णांच्या हातावर ‘होम आयसोलेशन’चा शिक्का मारून व त्यांच्या घराच्या दारावर स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला..

Lokmat Impact: Stamps of 'home isolation' on patients hand and stickers on door | लोकमत इम्पॅक्ट : आता ‘होम आयसोलेशन’ झालेल्या रूग्णांच्या हातावर शिक्का व घराच्या दारावर स्टिकर्स 

लोकमत इम्पॅक्ट : आता ‘होम आयसोलेशन’ झालेल्या रूग्णांच्या हातावर शिक्का व घराच्या दारावर स्टिकर्स 

googlenewsNext
ठळक मुद्देहोम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधितांकडून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास

पुणे : ‘होम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांचा घराबाहेरील होणारा सर्रास वावर रोखण्यासाठी, पुणे महापालिकेने आता पुन्हा अशा कोरोनाबाधित रूग्णांना हातावर ‘होम आयसोलेशन’चा शिक्का मारून व त्याच्या घराच्या दारावर ‘होम आयसोलेशन’च्या आदेशाचे स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. 
    कोरोनाची कुठलीही लक्षणे नाहीत पण पॉझिटिव्ह आहेत, असे शेकडो कोरोनाबाधित रूग्ण तपासणीअंती ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्विकारून घरी राहतात. पण एक दोन दिवस घरात राहिल्यावर हे रूग्ण सर्रासपणे घराबाहेर पडून गर्दीत मिसळत असल्याचे आढळून आले.तसेच अशा होम आयसोलेशन’ झालेल्या कोरोनाबाधितांकडून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले.या पार्श्वभूमीवर अशा रूग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा महापालिकेने त्यांची ओळख पटावी म्हणून, ‘होम आयसोलेशन’ साठी घरी पाठवितानाच त्यांच्या हातावर ओसोलेशनचा कालावधी नमूद असलेला व महिनाभर तरी पुसली जाणार नाही अशा शाईचा वापर करून शिक्का मारण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच वॉर्ड ऑफिस स्तरावरून संबंधित रूग्णाच्या घराच्या दारावर तसेच दर्शनी भागावर ‘होम आयसोलेशन’चे स्टिकर्स लावले जाणार आहे. यामध्ये आयसोलेशन झालेल्या व्यक्तीचे नाव, आयसोलेशनचा कालावधी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाºया यंत्रणेचे संपर्क क्रमांकही नमूद करण्यात येणार आहे. 
    पुणे महापालिका हद्दीत साधारणत: सात हजार कोरोनाबाधित रूग्णांनी ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारला आहे. अशा सर्व रूग्णांपर्यंत पोहचण्यासाठी व त्यांचा सामाजिक जीवनात १४ दिवस वावर होणार नाही याकरिता कसे निर्बंध घालता येतील याबाबत महापालिका प्रशासनाकडून शुक्रवारी नियोजन करून, त्याबाबतचे आदेश व नियमावली प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांना पाठविण्यात येणार आहे.
---------------------
‘होम आयसोलेशन’ झालेली व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास होणार पोलीस कारवाई 
    महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटर मध्ये न राहता ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून १४ दिवस घरात राहणार असे हमीपत्र देऊन घरीच राहणारी कोरोनाबाधित व्यक्ती यापुढे घराबाहेर फिरताना दिसल्यास संबंधितांवर आता थेट पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत महापालिका ‘होम आयसोलेशन’ चा पर्याय स्विकारून घरी परतलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीचे नावे, पत्ता व आयसोलेशन कालावधी याचा तपशील पोलीस यंत्रणेला सूपूर्त करणार आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या-त्या भागातील होम आयसोलेशन झालेल्या रूग्णांची माहिती देऊन त्यांच्यावर घराबाहेर पडल्यास कारवाई केली जाणार आहे.ही कारवाई काय असेल याचा तपशील शुक्रवारी होणाºया बैठकीत निश्चित होणार आहे. 
------------------------

Web Title: Lokmat Impact: Stamps of 'home isolation' on patients hand and stickers on door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.