पिंपरी : जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्कात सवलत देऊन शासनाची सहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू याला अटक करण्यात आली आहे. भोर येथील त्याच्या निवासस्थानावरून त्याला ताब्यात घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी पुण्यातील मौजे मुंढवा येथील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाला देय असलेले मुद्रांक शुल्क न भरता तब्बल सहा कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात दि. ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी संतोष अशोक हिंगाणे (५५, सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुंद्राक जिल्हाधिकारी, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यावरून जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल किशनचंद तेजवाणी, अमिडीया कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र. ४ येथे हा व्यवहार झाला होता. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांनी परस्पर संगनमत करून मौजे मुंढवा सर्वे नं. ८८ या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर भोगवटदाराचे नाव "मुंबई सरकार" असल्याचे माहिती असतानाही व आवश्यक शासन परवानगी न घेता व्यवहार केला.
शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना पाच कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. तरीही संशयितांनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे ६ कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथून अटक केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिली. पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' कंपनीमुळे हा जमीन व्यवहार चर्चेत आला होता.
Web Summary : Ravindra Taru arrested for a land deal scam involving stamp duty evasion, causing ₹6 crore loss to the government. He colluded with others in Mundhwa land deal.
Web Summary : मुंढवा भूमि सौदे में स्टांप शुल्क चोरी के आरोप में रवींद्र तारू गिरफ्तार, जिससे सरकार को ₹6 करोड़ का नुकसान हुआ। वह अन्य लोगों के साथ मिलकर घोटाले में शामिल था।