के.के. बिर्ला फाउंडेशनचा यंदाचा 'सरस्वती सन्मान' साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 09:21 PM2021-03-30T21:21:47+5:302021-03-30T21:22:00+5:30

"देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित..."

K.K. Birla Foundation's this year's 'Saraswati Sanman' literary Dr. Announced to Sharankumar Limbale | के.के. बिर्ला फाउंडेशनचा यंदाचा 'सरस्वती सन्मान' साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

के.के. बिर्ला फाउंडेशनचा यंदाचा 'सरस्वती सन्मान' साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना जाहीर

googlenewsNext

पुणे : के के. बिर्ला फाऊंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत
प्रतिष्ठेचा 2020 चा ‘सरस्वती सन्मान’ प्रसिद्ध साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीस जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पंधरा लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विजय तेंडूलकर यांच्या ‘कन्यादान’ (1983) आणि महेश एलकुंचवार यांच्या ‘युगान्त’ (2002) नंतर 19 वर्षांनी हा सन्मान एका मराठी लेखकाला मिळाल्याने भाषाप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
 

दरवर्षी के के. बिर्ला फाऊंडेशनच्या वतीने कविता, कादंबरी, नाटक,
हास्य-व्यंग,ललित लेखन, आत्मकथा, समीक्षा आदी विविध प्रकारातील भारतीय भाषांमधील उत्कृष्ट कलाकृतींसाठी साहित्यिकांना ’’सरस्वती सन्मान प्रदान केला जातो. मात्र ,त्यासाठी लेखकाची कोणत्याही भाषेतील ही साहित्यकृती सन्मानाच्या दहा वर्षे आधीच्या कालावधीत प्रकाशित झालेली असावी असा निकष
ठेवण्यात आला आहे. या सन्मानाच्या निवडीसाठी समिती स्थापन करण्यात आली.
त्यामध्ये समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष कश्यप (लोकसभा सचिवालयाचे माजी महासचिव, दिल्ली), गोविंद मिश्र (भोपाळ), प्रा.के सच्चिदानंदन (सिमला),डॉ. बुद्धधीनाथ मिश्र (डेहराडून), डॉ. किरण बुदकुले (गोवा), डॉ.सी.मृणालिनी (हैद्राबाद),डॉ. पारमिता सतपती त्रिपाठी (नवी दिल्ली), डॉ.सदानंद मोरे (पुणे), प्रा,ललित मंगोत्रा (जम्मू), दर्शन कुमार वैद(जम्मू), प्रियवत भरतिया (नवी दिल्ली), डॉ. सुरेश ॠतुपर्ण (नवी दिल्ली) यांचा समावेश होता.
  मराठी वाडमयविश्वात डॉ. शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ’अक्करमाशी’ या त्यांच्या आत्मकथनाला मराठी साहित्यामध्ये महत्वाचे स्थान आहे. हे त्यांचे पुस्तक इतर भारतीय भाषांसह इंग्रजीमध्ये देखील भाषांतरित झाले आहे. त्यांच्या वैचारिक आणि परिवर्तनवादी लेखनाने दलित साहित्यात मोलाची भर घातली. ’गावकुसाबाहेरील कथा’, ‘झुंड’, दलित प्रेमकविता, दलित ब्राह्मण, दलित साहित्याचे
सौंदर्यशास्त्र, शतकातील दलित विचार आदी त्यांची विविध 40 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नांद्डमध्ये 2011 साली झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन आणि भोसरीतील 2019 च्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
--------------------------------------------------------------------------------------------
’देशातल्या एखाद्या दलित लेखकाला कदाचित पहिल्यांदाच हा प्रतिष्ठित
पुरस्कार मिळत आहे. आजवर आम्ही केवळ म्हणत असू, की आम्हाला मोठे पुरस्कार मिळायला हवेत. पण पुरस्कार मिळत नव्हते. आम्ही 70 वर्षे लेखन केले. आज आपण देशाची 75 वर्षे साजरी करण्याच्या उंबरठ्यावर असताना एक पाहिलेलं सुंदर स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. भारतीय स्तरावर एक नवीन कलाकृती म्हणून या कादंबरीची दखल घेतली गेली आणि त्याचा सन्मान झाला याचा खूप आनंद होत आहे. दलित साहित्यात जीवनमूल्य आणि कलात्मकता आहे हे यातून सिद्ध झाले आहे. एका जीवनवादी साहित्याचा हा गौरव आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला दोनशे वर्ष पूर्ण झाली. त्यापाशर््वभूमीवर ही ’सनातन’ कादंबरी लिहिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी दलित-आदिवासींनी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष केला. मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. इतिहासात त्यांच्या योगदानाचा कुठेही गौरव झालेला नाही. त्यामुळे मी ‘सनातन’ मधून नवा इतिहास उभा केला आहे. दलिताच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही कादंबरी आहे- डॉ. शरणकुमार लिंबाळे, प्रसिद्ध साहित्यिक
--------------------------------------

 

Web Title: K.K. Birla Foundation's this year's 'Saraswati Sanman' literary Dr. Announced to Sharankumar Limbale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.