Jayant Narlikar: 'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:55 IST2025-05-20T09:55:21+5:302025-05-20T09:55:40+5:30
Jayant Narlikar Passes Away: कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले

Jayant Narlikar: 'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
पुणे : प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच शांतपणे अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते, मात्र वयोमानानुसार प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक तेजस्वी तारा मावळला आहे.
डॉ. नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.
विविध महत्वपूर्ण पुरस्कारांचे ते मानकरी ठरले
डॉ जयंत नारळीकर यांनी जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासमवेत ‘कन्फॉर्मल ग्रँव्हिटी थिअरी’ मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. खगोल क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ आणि पद्मविभूषण’ हा सर्वोच्च सन्मान देखील मिळाला. परंतु, केवळ संशोधन क्षेत्रात कार्यरत न राहाता त्यांनी लेखनाच्या माध्यमातून विज्ञानवादाचा प्रसार केला ‘अंतराळातील भस्मासूर’,अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, सूर्याचा प्रकोप ही त्यांची काही गाजलेली विज्ञानवादी पुस्तके. ‘चार नगरांतले माझे विश्व''या त्यांच्या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार, ‘यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार तसेच अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार आणि फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार आदी विविध महत्वपूर्ण पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
डॉ. जयंत नारळीकर यांची साहित्य संपदा
अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाइम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस.
इतर विज्ञानविषयक पुस्तके
अंतराळ आणि विज्ञान, आकाशाशी जडले नाते, गणितातील गमतीजमती, नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर), नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान, विश्वाची रचना, विज्ञान आणि वैज्ञानिक, विज्ञानगंगेची अवखळ वळणे, विज्ञानाची गरुडझेप, विज्ञानाचे रचयिते, सूर्याचा प्रकोप, चार नगरांतले माझे विश्व (आत्मचरित्र)