inspiring initiative by fc students ; they gives books to birthday person instead of cake | फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा अनाेखा उपक्रम ; वाढदिवसाला केक ऐवजी देतात पुस्तक
फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा अनाेखा उपक्रम ; वाढदिवसाला केक ऐवजी देतात पुस्तक

पुणे :  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमधील एखाद्याचा वाढदिवस असला की ताे जाेरदार साजरा केला जाताे. कट्ट्यावर मित्र -मैत्रिणी जमून ज्याचा वाढदिवस असताे त्यासाठी केक आणतात. अनेकदा ताे केक खाल्ला कमी आणि चेहऱ्यालाच अधिक लावला जाताे. या विरुद्ध फर्ग्युसनच्या काही विद्यार्थ्यांनी एक अनाेखा उपक्रम हाती घेतला असून वाढदिवस असणाऱ्यासाठी केक ऐवजी वैचारिक पुस्तक भेट दिले जात आहे. केक वरील खर्च टाळून ताे पुस्तकांवर खर्च करण्यात येत आहे. 

चला वैचारिक वाढदिवस साजरा करु या टॅगलाईनखाली फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थी वाढदिवसाला पुस्तके वाटण्याचा उपक्रम राबवित आहेत. महाविद्यालयातील काेणाचाही वाढदिवस असून हे विद्यार्थी आपल्या मित्र-मैत्रिणींकडून वर्गणी गाेळा करुन त्या व्यक्तीसाठी एखादे वैचारिक पुस्तक घेऊन येतात आणि भेट देतात. केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर प्राध्यपकांना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वैचारिक पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आहेत. दाेन महिन्यांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असून आत्तापर्यंत या विद्यार्थ्यांनी पंचवीसहून अधिक पुस्तके वाटली आहेत. यात वैचारिक पुस्तकांचा तसेच महापुरुषांवरील पुस्तकांचा समावेश आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी सुनील जाधव म्हणाला, वाढदिवसाच्या दिवशी केकवर खर्च करण्याऐवजी पुस्तकांवर खर्च करावा असे आम्ही विद्यार्थ्यांनी ठरवले. अनेकदा वाढदिवसासाठी आणलेला केक एकमेकांच्या चेहऱ्याला लावला जाताे. तसेच त्याची नासाडी देखील केली जाते. त्यामुळे केकवर पैसे खर्च न करता त्यातून एखादे पुस्तक ज्या काेणाचा वाढदिवस असेल त्याला देण्याचे आम्ही ठरवले. ही भेट त्या विद्यार्थ्याला आयुष्यभर लक्षात राहील अशी आहे. त्याचबराेबर त्याला त्या पुस्तकामधून ज्ञान देखील मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा हाेणार आहे. त्यामुळे गेली दाेन महिने आम्ही हा उपक्रम फर्ग्युसन महाविद्यालयात राबवित आहाेत. 
 


Web Title: inspiring initiative by fc students ; they gives books to birthday person instead of cake
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.