Independent Cell will start soon by Police for the safety of industries | उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा स्वतंत्र इंडस्ट्रियल सेल :पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा निर्णय 
उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीसांचा स्वतंत्र इंडस्ट्रियल सेल :पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा निर्णय 

हनुमंत देवकर 
चाकण : औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात उद्योजक व कामगारांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
        उद्योगनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. भोसरी, चिंचवडसह आयुक्तालयांतर्गत असलेल्या चाकण, तळेगाव दाभाडे या भागातील औद्योगिक पट्ट्यात अनेक छोटे-मोठे उद्योग असून, यामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, येथील उद्योजकांना माथाडीच्या नावाखाली धमकावणे, खंडणी वसूल करणे, ठेकेदारी मिळविण्यासाठी दहशत निर्माण करणे, कामगारांची लूटमार करणे, असे प्रकार वारंवार घडतात. यापूर्वीही काही गंभीर घटना घडल्या आहेत. 
अशा प्रकारची गुन्हेगारी कमी करण्यासह औद्योगिक पट्ट्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी उद्योजकांसह कामगार संघटना यांनी वारंवार पोलिसांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेले हे प्रकार रोखण्यासाठी आयुक्तालयात आता ‘इंडस्ट्रियल सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलसाठी एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, वीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. या सेलकडून उद्योजक, कामगारांशी संबंधित तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीसह चाकण, तळेगाव दाभाडे, आंबी या एमआयडीसीचाही समावेश आहे. यापूर्वी यातील एखाद्या घटनेसंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्याकडून तपास केला जात होता. आता मात्र पोलीस ठाण्यासह या इंडस्ट्रियल सेलकडूनही समांतर तपास होणार आहे. 

  आर. आर. पाटील (सहायक पोलीस आयुक्त)  :‘औद्योगिक पट्ट्यात उद्योजकांना, कामगारांना धमकाविण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत उद्योजकांकडून तक्रारी आल्या होत्या. त्यादृष्टीने हा सेल काम करेल.  

Web Title: Independent Cell will start soon by Police for the safety of industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.