नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 04:08 PM2021-09-06T16:08:40+5:302021-09-06T16:10:28+5:30

शिवसेना नेते संजय राऊत यांचं कोथळा बाहेर काढू वक्तव्य धमकीच...ती भाजप कदापि खपवून घेणार नाही.

If Narayan Rane is arrested then why not Sanjay Raut? BJP aggressive in Pune | नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक 

नारायण राणेंना अटक केली जाते तर मग संजय राऊतांना का नाही? पुण्यात भाजप आक्रमक 

googlenewsNext

पुणे : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाठीमागून वार करण्याची आमची परंपरा नाही. आम्ही समोरुन कोथळा बाहेर काढतो असं वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्यावरून भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला असून संजय राऊत यांना पुण्यात फिरू न देण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपकडून त्यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत हे मागील दोन दिवस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिरूर, खेड, जुन्नरमध्ये शिवसेनेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं होतं तसेच भाजपवर देखील जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. काल खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधला होता. आता भाजपने देखील राऊतांना गर्भित इशारा दिला आहे. 

भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना पुण्यात फिरू देणार नाही, असा इशाराही दिला आहे. तसेच कोथळा बाहेर काढू हे त्यांचं वक्तव्य एकप्रकारे धमकीच दिल्यासारखी आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे आता राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर राज्यभरात आंदोलन करण्यात येईल असेही मुळीक यावेळी म्हणाले. 

संजय राऊत यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत देखील नाही. ते वादग्रस्त वक्तव्य करून राजकारण करत असल्याचा आरोपही मुळीक यांनी यावेळी केला. राऊत यांचे कोथळा बाहेर काढू हे वक्तव्य आपल्या संस्कृतीला शोभणारं नाही असेही मुळीक यांनी यावेळी सांगितले. 

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे म्हणाले, पुणे शहर भाजपच्या वतीने संजय राऊत यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज स्वीकारला असून कायदेशीर बाबींचा संदर्भ घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते... 
आतापर्यंत पाठीत खंजीर खुपसला असं म्हटलं तर एकच चेहरा समोर याचचा, तो कोणाचा? असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारतानाच त्यावर उपस्थितांनी शरद पवार असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी आता पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले की दुसरा चेहरा ही समोर येतो, तो कोणाचा? असा प्रश्न विचारताच त्यावर उपस्थितांपैकी काहींनी उद्धव ठाकरेंचा नाव घेतले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला होता. 

Web Title: If Narayan Rane is arrested then why not Sanjay Raut? BJP aggressive in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.