पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 11:44 AM2020-11-23T11:44:17+5:302020-11-23T11:46:12+5:30

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे.

The highest number of flights from Delhi coming in the Pune; Fear of an increase in the number of corona patients in the city | पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती

पुण्यात दिल्लीतून येतात सर्वाधिक विमाने; शहरातील कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची भीती

Next

पुणे : दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला असल्याने देशभरातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट गडद होत चालले आहे. पुणे शहरातही रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यातच सध्या पुण्यातून ये-जा करणाऱ्या विमानांमध्ये दिल्लीची विमाने सर्वाधिक आहेत. पुणे विमानतळावर शुक्रवारी एकुण ६६ विमानांची ये-जा झाली. त्यामध्ये सर्वाधिक २३ विमाने दिल्लीची होती.

पुणे विमानतळावरून दिल्लीसह बेंगलुरू, कोलकाता, हैद्राबाद, चेन्नई, लखनऊ, अहमदाबाद या प्रमुख शहरांसह १३ हून अधिक शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. धावपट्टीच्या दुरूस्तीसाठी विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुढील वर्षभर बंद राहणार असल्याने सध्या दररोज केवळ ६० ते ७० विमानांचीच ये-जा होत आहे. पण या विमानांमध्येही जवळपास २० हून अधिक विमाने दिल्लीला ये-जा करणारी आहेत. त्यापाठोपाठ बेंगलुरूसाठी ३ ते ५ तर अन्य शहरांसाठी जास्तीत जास्त २ ते ३ विमाने आहेत. रोजची प्रवासी संख्याही सध्या ७ ते ८ हजारांच्या जवळपास आहे. लॉकडाऊनपुर्वी हा आकडा २० हजारांच्या जवळपास होता.

कोरोनाची भीती कमी होत गेल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली. पण आता पुन्हा दिल्लीसह अन्य काही शहरांमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा दिल्लीला मोठा तडाखा बसला आहे. परिणामी, महाराष्ट्रासह काही राज्यांनी दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. पुण्यातही दिल्लीतून दररोज २० हून अधिक विमानांची ये-जा सुरू आहे. त्यातून सुमारे अडीच ते तीन हजार प्रवासी पुण्यात येत आहेत.
----------
मागील महिन्याच्या मध्यापर्यंत बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवसांचे होम क्वारंटाईन व हातावर शिक्का बंधनकारक होता. पण आता हे बंधनही नाही. त्यामुळे दिल्लीसह अन्य शहरांतून येणारे प्रवासी सहजपणे शहरभर वावरू शकतात. तसेच संबंधित विमानतळांवरही आरोग्य सेतु अ‍ॅप, शरीराचे तापमान आणि मास्क पाहिले जाते.
-------------
दिल्लीतून ये-जा करणारी विमाने व प्रवाशांची संख्या कमी झालेली नाही. तसेच येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आलेली नाही.
- कुलदीप सिंग, संचालक, पुणे विमानतळ
-------------
मागील काही दिवसांत दिल्लीतून ये-जा केलेली विमाने
दिवस आलेली गेलेली
२१ नोव्हेंबर १० ९
२० नोव्हेंबर १२ ११
१९ नोव्हेंबर १२ ११
१८ नोव्हेंबर १२ ११
१७ नोव्हेंबर १२ १०
-----------------------------------

Web Title: The highest number of flights from Delhi coming in the Pune; Fear of an increase in the number of corona patients in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.