कोरोना लसीकरणाकडे निम्म्यांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:11 AM2021-01-17T04:11:55+5:302021-01-17T04:11:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्च २०२० पासून गेली अकरा महिने जग कोविड-१९ विषाणूवर रोखणारी लस कधी येणार याची ...

Half turned to corona vaccination | कोरोना लसीकरणाकडे निम्म्यांनी फिरवली पाठ

कोरोना लसीकरणाकडे निम्म्यांनी फिरवली पाठ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्च २०२० पासून गेली अकरा महिने जग कोविड-१९ विषाणूवर रोखणारी लस कधी येणार याची प्रतिक्षा करत होते. प्रत्यक्षात ही लस जेव्हा आली तेव्हा मात्र पहिल्याच दिवशी नोंदणी केलेल्यांपैकी ४५ टक्के आरोग्य सेवकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशीच्या लसीकरणासाठी निवडलेली सर्वच्या सर्व म्हणजे आठशे मंडळी वैद्यकीय क्षेत्राशी थेट संबंधित डॉक्टर, परिचारिका आदी होती. जग रोखलेल्या कोविड-१९ ची भीती ओसरल्याचे हे लक्षण की लशीबद्दलची अविश्वासार्हता याबद्दल मतमतांतरे आहेत.

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार पालिकेने जय्यत तयारी करुन ८०० आरोग्य सेवक शनिवारच्या (दि. १६) लसीकरणासाठी निवडले होते. प्रत्यक्षात यातल्या ४३८ जणांनीच लस टोचून घेतली. लस घेण्यासाठी नावनोंदणी केलेल्या ३२ जणांनी रुग्णालयात आल्यावर लस टोचून घेण्यास नकार दिला. उर्वरीत ३३० आरोग्य सेवकांनी नाना कारणांनी लसीकरणास दांडी मारली. दिवसभरात शहरात ५५ टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोविड प्रतिबंधक लस देण्याकरिता पालिकेने गेल्या १५ दिवसांपासून तयारी चालू केली होती. लसीकरणासाठी प्रशिक्षण, बैठका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रंगीत तालीम आदी सोपस्काराचा धुमधडाका उडवून देण्यात आला होता. पालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, डॉ. अंजली साबणे, डॉ. संजीव वावरे, डॉ. कल्पना बळीवंत, डॉ. अमित शहा आदी त्यासाठी मेहनत घेत होते.

लसीकरणाचा प्रारंभ शनिवारी सकाळी कमला नेहरु रुग्णालयात महापौरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शहरातील निश्चित केलेल्य आठ केंद्रांवर लसीकरण सुरु झाले. दुपारी अडीचपर्यंत २९ टक्के लसीकरण झाले. त्यानंतर लसीकरणाचा वेग एकदम मंदावला. दर तासाला केवळ ५० च्या आसपासच लसीकरण झाले.

ठरलेल्या प्राधान्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांना लस देण्यात आली. शहरातील आठ केंद्रांवर प्रत्येकी १०० याप्रमाणे ८०० जणांना लस दिली जाणार होती. प्रत्यक्षात यातील ४३८ जणांनीच प्रत्यक्ष लसीकरण करुन घेतले. एकंदरीतच आरोग्य सेवकांमध्येही लसीबाबत काही प्रमाणात का होईना भीतीचे वातावरण असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांनी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर लस टोचून घेण्यास नकार दिला. पालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांच्या यंत्रणांमध्ये असलेला उत्साह लाभार्थ्यांमध्ये मात्र दिसला नाही.

चौकट

उशीर झाल्याचे सांगत अनेकांचा काढता पाय

सकाळी नऊपासून लसीकरण सुरु होणार असल्याचा निरोप लाभार्थ्यांना देण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनानंतर अकरा वाजता प्रत्यक्ष लसीकरण सुरु होणार असल्याचा बदल त्यात झाला. याचा निरोप न मिळाल्याने अनेकजण सकाळी वेळेत हजर झाले. परंतु, दोन तास थांबावे लागल्याने त्यातील बहुतांश लोक निघून गेले. संपर्क साधून बोलावले असता अनेकांनी परत येण्यास नकार दिला.

चौकट

आठ केंद्रात झालेले लसीकरण

कै. जयाबाई सुतार प्रसुतीगृह, कोथरुड - ४७

कमला नेहरु रुग्णालय, सोमवार पेठ - ३४

राजीव गांधी रुग्णालय, येरवडा - ४७

ससून सर्वोचपचार रुग्णालय - ६२

रुबी हॉल क्लिनिक, नगर रस्ता - ५७

नोबल हॉस्पिटल, हडपसर - ७३

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय - ६४

भारती हॉस्पिटल, कात्रज - ५४

एकूण ४३८

चौकट

वेळेप्रमाणे झालेले लसीकरण

दुपारी अडीचपर्यंत - २३०

२.३० ते ३.३० - ९८

३.३० ते ४.३० - ४९

४.३० ते ५.३० - ५१

चौकट

ज्या कमला नेहरु रुग्णालयात लसीकरणाचे उद्घाटन झाले त्याच रुग्णालयात सर्वात कमी अवघे ३४ टक्के लसीकरण झाले. महापौरांसह सर्व पदाधिकारी आणि आयुक्तांसह सर्व अधिकारी या रुग्णालयात उपस्थित होते. पहिल्या दिवशीच्या लसीकरणासाठी शासनाने चार खासगी आणि चार सरकारी रुग्णालये निवडली होती. सर्वाधिक लसीकरण अनुक्रमे नोबल हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, ससून रुग्णालय, रुबी हॉल क्लिनिक, भारती हॉस्पिटल येेथे झाले. पालिकेच्या कमला नेहरु, सुतार दवाखाना, राजीव गांधी रुग्णालय याठिकाणचा प्रतिसाद कमी होता.

चौकट

लस ऐच्छिक होती

“एकूण ४३८ आरोग्य सेवकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. ही लस ऐच्छिक होती. लसीकरणानंतर कोणालाही त्रास झाला नाही. पहिल्या अनुभवानंतर पुढील वेळेस आणखी चांगले नियोजन करता येईल. लसीकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठवू. शासनाच्या पुढील आदेशानुसार लसीकरणाचे नियोजन करण्यात येईल. पालिकेच्या संपूर्ण यंत्रणेने, आरोग्य विभागाने लसीकरणासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. कोरोनाला हरविणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे.”

- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त

Web Title: Half turned to corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.