प्रवास अर्ध्यात आणि ‘अश्वमेध’ अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 01:36 PM2019-12-28T13:36:57+5:302019-12-28T13:48:34+5:30

एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या अश्वमेध व शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी बस आहेत.

Half of the journey and 'Ashwamedh' in the dark | प्रवास अर्ध्यात आणि ‘अश्वमेध’ अंधारात

प्रवास अर्ध्यात आणि ‘अश्वमेध’ अंधारात

Next
ठळक मुद्देप्रवाशांकडून तिकिटाचे प्रत्येकी ४४० रुपये चालकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण

पुणे : तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव चालकाने प्रवाशांना अश्वमेध बसमधून बाणेरजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरच उतरविल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. सर्व प्रवाशांची जाण्याची व्यवस्था होण्यापूर्वीच हा चालक बससह पुढे निघून गेल्याने प्रवाशांना धक्का बसला. या मार्गावर बराच वेळ काही प्रवाशांना रिक्षा किंवा इतर वाहन न मिळाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 
एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या अश्वमेध व शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी बस आहेत. प्रामुख्याने पुणे ते मुंबई, पुणे ते ठाणे, पुणे ते बोरिवली मार्गावर या बस सोडण्यात येतात. इतर बसच्या तुलनेत तिकीटदर अधिक असूनही या सेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसादही मिळत आहे. पण बसमधील सोयी-सुविधांबद्दल प्रवाशांकडून विविध तक्रारी केल्या जात आहेत. बस मार्गातच बंद पडणे, अस्वच्छता, पडदे खराब असणे, बंद चार्जिंग पॉईंट, वातानुकूलित यंत्रणा बंद असणे अशा तक्रारी सातत्याने केल्या जातात. बस मार्गातच बंद पडण्याचे प्रमाण नगण्य असल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून केला जातो. पण प्रवाशांना अनेकदा असा अनुभव येत आहे. शुक्रवारीही प्रवाशांना अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले. ठाणे वंदना येथून दुपारी साडेतीनच्या सुमारास अश्वमेध ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. शिवनेरी बस उपलब्ध न झाल्याने अश्वमेध सोडली. बस रात्री आठच्या सुमारास बाणेरजवळ आल्यानंतर चालकाने तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. महामार्गावरच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. काही वेळात मागून बोरीवली येथून आलेल्या शिवनेरी बसमध्ये त्यांना जागा देण्याचा प्रयत्न केला. पण बसमध्ये पुरेशा जागा नसल्याने तसेच उभे राहिल्यानंतर आधारासाठी काही व्यवस्था नसल्याने काही प्रवासी खालीच थांबले. 
पुढे शिवनेरी बस गेल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने थांबविण्यात आलेली बसही चालकाने दामटली. हा प्रकार पाहून प्रवाशांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे चालकाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, एसटी अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांना याबाबत उशिरापर्यंत माहिती मिळाली नव्हती.
......
प्रवाशांना मनस्ताप
प्रवाशांकडून तिकिटाचे प्रत्येकी ४४० रुपये घेण्यात आले. पण त्यांना रस्त्यातच सोडून बसचालक निघून गेला. काही प्रवासी दुसºया बसने निघून गेले. पण जागेअभावी काही प्रवाशांना तिथेच थांबावे लागले. 
.......
महामार्गावर जाण्यासाठी रिक्षा किंवा इतर कोणतेही वाहन मिळत नव्हते. मिळेल त्या वाहनाने प्रवाशांना जावे लागले. या प्रवाशांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक, महिलाही होत्या. त्यांच्याकडे मोठ्या बॅगा होत्या. त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. बसचालकाच्या या वागणुकीवर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
...........
परतावा मिळणार का ?
बस बंद पडल्यानंतर दुसरी बस उपलब्ध होईपर्यंत चालक किंवा वाहक तिथेच थांबून राहतात. पण शुक्रवारी घडलेल्या प्रकाराने प्रवासी हैराण झाले. एसटीचे ४४० रुपयांचे तिकीट काढूनही पुन्हा दुसºया वाहनासाठी पैसे घालवावे लागले. प्रवाशांचे हे आर्थिक नुकसान एसटीने भरून द्यायला हवे. याची भरपाई एसटीने द्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Web Title: Half of the journey and 'Ashwamedh' in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.