हुल्लडबाजांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 02:00 PM2019-05-21T14:00:37+5:302019-05-21T14:07:28+5:30

४० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले पळसदेव येथील ऐतिहासिक पळसनाथ मंदिर उघडे पडले आहे...

The Gram Panchayat took steps to stop the criminals | हुल्लडबाजांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलली

हुल्लडबाजांना रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलली

Next
ठळक मुद्देसुुरक्षारक्षक तैनात करणार : पळसनाथ मंदिर परिसरात सूचनाफलकऐतिहासिक पळसनाथ मंदिर यादवकालीन असून, हेमाडपंती शैलीतील

इंदापूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पळसदेव (ता. इंदापूर) येथील पळसनाथ मंदिर परिसरातील हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी येथील काही पर्यटकांनी केली होती. याबाबत सोमवारी (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्तदेखील प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल घेत पळसदेव ग्रामपंचायतीच्या वतीने सुरक्षारक्षक व सूचनाफलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सरपंच अश्विनी काळे यांनी दिली.  
दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणाची पाणीपातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे सुमारे ४० वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेले पळसदेव येथील ऐतिहासिक पळसनाथ मंदिर उघडे पडले आहे. हे मंदिर यादवकालीन असून, हेमाडपंती शैलीतील आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैली व अप्रतिम कलाकुसरीमुळे हे मंदिर नेहमीच इतिहासप्रेमी, अभ्यासक, पर्यटक यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे; मात्र काही हुल्लडबाजांमुळे या मंदिराच्या पावित्र्याला व बांधकामाला धोका पोहोचत आहे. मंदिराच्या शिखरावर चढून सेल्फी घेणारेही महाभाग आहेत. त्यामुळे मंदिराच्या पावित्र्याला धोका पोहोचत आहे. मंदिर पाण्याखाली गेले असले, तरी येथील ग्रामस्थ पाणीपातळी घटल्यानंतर, मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या मंदिराशी येथील ग्रामस्थांचे भावनिक नाते घट्ट आहे; मात्र हुल्लडबाजा येथील वास्तूचे नुकसान करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
..........
मंदिर परिसरात मोठ्याप्रमाणात पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या पदार्थांचा कचरा अढळून येतो. रविवार (दि. १९) सुटीच्या दिवसामुळे पुणे, इंदापूर, बारामती, सोलापूर, राशिन, करमाळा आदी भागातील अनेक इतिहासप्रेमींनी या मंदिराला भेट दिली. या वेळी हुल्लडबाजांच्या कृतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.  
हुल्लडबाजांना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी ‘लोकमत’कडे केली होती. यासंदर्भात, सोमवारी (दि. २०) ‘लोकमत’मध्ये वृत्त देखील प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत पळसदेव ग्रामपंचायतीने पावले उचलली आहेत; तसेच परिसरातील इतिहासप्रेमींनी देखील अशा हुल्लडबाजांना रोखून त्यांची तक्रार ग्रामपंचायतीकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
.........
 पळसनाथाचे पुरातन मंदिर पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक; तसेच इतिहास अभ्यासक येतात. मात्र, त्या ठिकाणी काही लोक हुल्लडबाजी करतात तसेच मंदिरावर नाव कोरून मंदिराची दुर्दशा करण्याचा प्रयत्न करतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी वेगवेगळे सूचनाफलक येत्या दोन दिवसांत लावणार आहोत; तसेच मंदिर परिसरात कचराकुंड्या ठेवणार आहोत. हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच काही पर्यटक हौसेपोटी नावेतून पर्यटनस्थळी जातात. त्या नावेला कसलाही परवाना नाही. कोणत्याही नावेत लाईफ जॅकेट नाहीत. आम्ही त्याबाबत सर्व नावमालकांना नावेत लाईफ जॅकेट ठेवण्याचे आदेश देणार आहोत.  - अश्विनी संतोष काळे, सरपंच. 
.........

Web Title: The Gram Panchayat took steps to stop the criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Bhigwanभिगवण