खुशखबर! पुणे जिल्ह्यातील उद्योगांचा गाडा वर्ष अखेरीस येणार रुळावर; 'एमसीसीआयए'ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:14 PM2020-10-05T15:14:31+5:302020-10-05T15:20:58+5:30

कोरोनामुळे रुतलेला उद्योगांचा गाडा वेग पकडू लागला आहे.

Good news! The industry will be on track by the end of the year | खुशखबर! पुणे जिल्ह्यातील उद्योगांचा गाडा वर्ष अखेरीस येणार रुळावर; 'एमसीसीआयए'ची माहिती

खुशखबर! पुणे जिल्ह्यातील उद्योगांचा गाडा वर्ष अखेरीस येणार रुळावर; 'एमसीसीआयए'ची माहिती

Next
ठळक मुद्देअपेक्षेपेक्षा अधिक जलदगतीने उद्योग पूर्वपदावर येत असल्याची उद्योजकांनी दिली प्रतिक्रियाएमसीसीआयएने जिल्ह्यातील दीडशे लघु, सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद

पिंपरी : कोरोनामुळे रुतलेला उद्योगांचा गाडा वेग पकडू लागला आहे. दरमहा उत्पादन क्षमतेत आणि कामगारांच्या संख्येतही वाढ होत आहे. मे महिन्याच्या तुलनेत उत्पादन दुप्पट झाले असल्याचे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इ इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) पाहणीत समोर आले आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च-२०२०च्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्याच बरोबर जिल्हा आणि राज्य बंदी असल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला. मे महिन्यापासून टाळेबंदी उठविण्यास सुरुवात झाली. तेव्हा पासून सातत्याने उत्पादनात वाढ होत आहे. अपेक्षेपेक्षा अधिक जलदगतीने उद्योग पूर्वपदावर येत असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली.

एमसीसीआयएने जिल्ह्यातील दीडशे लघु, सूक्ष्म, मध्यम आणि मोठ्या उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्या नुसार मे महिन्यात उतपादन क्षमतेच्या ३२ टक्के उत्पादन होत होते. त्यात सप्टेंबर अखेरीस ५५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याच काळात कामगार संख्याही २३ वरून ६८ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोविडपूर्व उत्पादन पातळी गाठण्यासाठी आणखी तीन महिने लागतील असे २२ टक्के उद्योगांना वाटते. तर, ५३ टक्के उद्योग प्रतिनिधींनी ३ ते ९ महिने कालावधी लागेल अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, २४ टक्के उद्योगांनी सद्यस्थितीत यावर कोणते भाष्य करता येणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. ऑगस्टमध्ये एमसीसीआयएने केलेल्या पाहणीत काही कंपन्यांनी स्थिती सुधारण्यास ९ महिन्यांहून अधिक कालावधी लागेल असे सांगितले होते. त्या कंपन्यांना आता ३ ते नऊ महिन्यांत स्थिती सुधारेल असे वाटते. एमसीसीआयएने दीडशे उद्योगांच्या पाहणीतील ६३ टक्के उद्योग उत्पादन क्षेत्रातील असून २४ टक्के सेवा क्षेत्रातील आहेत. उर्वरित कंपन्या दोन्ही क्षेत्रातील आहेत. 

--------

दरमहा उत्पादन क्षमतेत वाढ होत असल्याने उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. उत्पादनाबरोबरच कामगार संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे या वर्ष अखेरीस कोविडपूर्व स्थिती गाठण्यात उद्योग यशस्वी होतील. वाईटात वाईट स्थिती निर्माण झाल्यास आर्थिक वर्ष अखेरी पर्यंत हा कालावधी लांबेल. 

सुधीर मेहता, अध्यक्ष, एमसीसीआयए

-------  

उत्पादन आणि कामगार क्षमता टक्क्यामध्ये
महिना       उत्पादन   कामगार     
मे                ३२       २३
जून              ३६      ---
जुलै             ४६        ४७
ऑगस्ट        ५१         ५६
सप्टेंबर        ५५         ६८

-----------

क्षेत्रनिहाय सप्टेंबर अखेरची स्थिती टक्क्यात

क्षेत्र      उत्पादन क्षमता     कामगार क्षमता

सूक्ष्म      ३७                       ५६
लघु        ६३                        ७४
मध्यम     ५९                        ६९
मोठे       ५८                          ८४

Web Title: Good news! The industry will be on track by the end of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.