चांगभलं! खेड तालुक्यातील क्षेत्र खंडोबा मंदिर विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 01:30 PM2021-04-22T13:30:28+5:302021-04-22T13:32:13+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ट्विटद्वारे घोषणा; पर्यटन, कृषी औद्यगिक क्षेत्राला मिळणार चालना

Good! Fund of Rs. 56 crore sanctioned for development work of Khandoba temple in Khed taluka | चांगभलं! खेड तालुक्यातील क्षेत्र खंडोबा मंदिर विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

चांगभलं! खेड तालुक्यातील क्षेत्र खंडोबा मंदिर विकासकामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी मंजूर 

googlenewsNext

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड (धामणटेक ते मंदिर, मंदिर ते निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक) असा रिंगरोड व रोपवे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून ५६ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे.त्यामुळे पूर्व भागातील नागरिकांनी व भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.

खेड तालुक्याच्या पुर्व भागातील खंडोबा मंदिर राज्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखो भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातुन खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येतात. माघ पोर्णिमा व चैत्र पोर्णिमा या दिवशी देवाच्या यात्रेनिमित्त मोठी गर्दी या ठिकाणी होत असते. या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्टी, निमगाव व दावडी ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा केला होता. निमगाव येथील व नितीन गडकरी यांच्या खात्यातील प्रशाकिय अधिकारी संकेत भोंडवे यांच्या माध्यमातुन श्री क्षेत्र निमगाव खंडोबा येथे तीर्थक्षेत्र विकासासाठी आणि सुविधांसाठी ५६ कोटी रूपये मिळाले आहेत..खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशन शेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत. खेड ते मंदिर खरपुडी मार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हे देखील होणार आहे.

खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे-नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांना अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे. तसेच भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव ही अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानाशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत. प्रस्तावित रोप-वेमुळे वयस्कर आणि दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थान देवदर्शन सहज शक्य होणार आहे. या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. दावडी, निमगाव, कनेरसर या परिसराचा विकास होणार असल्यामुळे निमगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमर शिंदे, राज्य पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, दावडीचे सरपंच संभाजी घारे यांच्यासह ग्रामस्थांनी व भविकांनी आनंद व्यक्त केला आहे..

Web Title: Good! Fund of Rs. 56 crore sanctioned for development work of Khandoba temple in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.